सोलापूरला येताना भीती वाटते; पण देवदर्शनासाठी यावेच लागते !

- Advertisement -

सोलापूर : पंढरपूर, तुळजापूर अन् अक्कलकोट या तीर्थक्षेत्री देवदर्शनासाठी येणाऱ्या अवघ्या महाराष्ट्र आणि परराज्यातील भाविकांसाठी सोलापूर हे मध्यवर्ती ठिकाण. कर्नाटक, तेलंगणा आणि पश्चिम महाराष्ट्रतून जे भाविक येतात ते येथे मुक्काम करतात अन् दोन-तीन दिवसात या तीर्थक्षेत्रांचा दौरा करतात. सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताना मात्र या भाविकांना धडकी भरायला लागते.. कारण कुठे आपली गाडी अडवली जाते?..कुठे दमदाटी सहन करावी लागते?
की कुठे पैसे मोजावे लागतात? या भीतीने ग्रस्त असलेल्या भाविकांनी ‘लोकमत’जवळ व्यथा व्यक्त केली..सोलापूरला येताना भीती वाटते; पण काय करावे, देवदर्शनासाठी यावेच लागते हो !

परराज्य आणि महाराष्ट्र भरातील भाविकांना सोलापूरविषयी वाटणारी ही भीती या शहराची प्रतिमा खराब करणारी आहे. वस्तूत: सोलापूरकर दिलदार आणि सहकार्याची भावना ठेवणारे;पण महामार्गांवर वाहनं तपासणीच्या नावाखाली बाहेरील होणाऱ्या भाविकांची अडवणूक सोलापुरी माणसांच्या प्रतिमेवरही घाला घालणारी ठरत आहे. हे शहर उद्योग, व्यवसासाठी अनुकूल असताना नाहकपणे येथे प्रतिकुलता असल्याचा प्रसार होत आहे. ही बाब गंभीर असल्याचे अनेक सोलापूरकरांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

मुंबईहून तुळजापूरला जाणारे कारमधील रवी मगर हे प्रवासी म्हणाले की, वर्षातून आम्ही एकदा अक्कलकोट, गाणगापूर येथे देवदर्शनाला जाण्यासाठी येत असतो. सोलापुरात आलो की हायवेला आणि टोल नाक्याच्या ठिकाणी कुठे पोलीस अडवतील सांगता येत नाही. अडवले की त्यांची भाषा खूप उर्मट असते. आम्हाला विनंती करावी लागते, सोबत मुलं-बाळं असतात त्यांच्यासमोर आम्हाला पोलीस कसेही बोलतात. हा प्रकार टाळण्यासाठी आम्ही दंड भरतो आणि निघून जातो. सोलापुरातून प्रवास करणे म्हणजे गुन्हा आहे की काय असा प्रश्न आम्हाला पडतो. या प्रकारामुळे मी गेली दोन वर्षे देवदर्शनाला आलोच नाही. आता घरच्यांनी हट्ट केला म्हणून नाईलाजाने पुन्हा जातोय.

नऊ महिन्यापूर्वी आम्ही अक्कलकोटला जाण्यासाठी आलो होतो, तेव्हा खूप वाईट वागणूक आम्हाला मिळाली होती. आज सोलापूरला येताना मनात भीती वाटत होती; मात्र येताना कुठे पोलीस कर्मचारी आढळले नाहीत अशी प्रतिक्रिया पुण्यातील रामदेव अभंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आशुतोष स्वामी हे प्रवासी म्हणाले की, माझे मूळ गाव लातूर आहे. सासरवाडी सोलापूरचीच आहे, पण मी नोकरी पुण्यात करतो. माझा नेहमी पुणे, सोलापूर आणि सातारा असा कारचा प्रवास असतो. मला चार वर्षांपूर्वी वाहतूक शाखेचे पोलीस आणि हायवेचे पोलीस यांच्याकडून अडवणूक झाली होती. त्यावेळी माझा वादही झाला होता; मात्र नंतर पुन्हा कधी मला प्रवासात त्रास झाला नाही.

‘एम.एच-१३’ पाहताच आग्ऱ्यात मिळाला
लाठीचा प्रसाद : शशिकांत थोरात

  • मी गेल्या वर्षी क्रुझर गाडीमध्ये कुटुंबीयांसमवेत उत्तर प्रदेशातील आग्रा येथे गेलो होतो. ताजमहाल पाहून झाल्यानंतर आम्ही अयोध्येकडे जात होतो. आग्ऱ्याच्या पुढे पुलावर एम.एच-१३ हा क्रमांक पाहून तेथील वाहतूक पोलिसांनी आम्हाला अडवले. गाडी बाजूस घेण्यास सांगितले, आमचा ड्रायव्हर गाडीतून उतरतो तोच एका पोलिसाने दोन काठ्या मारल्या. हरामखोर एम.एच-१३ महाराष्ट्र सोलापूर से होना… चलो २५ हजार का फाईन भरो, असा आदेश दिला.

आम्ही त्यांना विनंती करीत होतो, साब हमारा कसूर क्या है। आप क्यूँ हमे तकलीफ दे रहे है। त्यावर त्या पोलीस कर्मचाऱ्याने तुम्हारे सोलापूर के पोलीस हमारे यहाँ के गाडी वालोंको बहुत तकलीफ देते है. तुमको छोडना नही चाहिए… असे म्हणत शिवीगाळ करीत होता. २५ हजारांची रक्कम तडजोडीने ३ हजारांवर आणली आणि हात जोडून आम्ही निघून आलो, अशी माहिती शशिकांत थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

वाहतूक पोलिसांचा त्रास हा फक्त सोलापुरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आम्ही कायद्याचे उल्लंघन केले तर कारवाई करण्यात यावी; मात्र चालक दोन का नाहीत, सीट बेल्ट का लावला नाही, यावरुन त्रास देणे चुकीचे आहे. आम्ही जेव्हा राज्याच्या बाहेर जातो, तिथे असा त्रास होत नाही.

हेमंत जगताप,
ट्रक चालक, पुणे

- Advertisement -