ठाणे : महिलांशी फेसबूक आणि व्हॉटस अॅपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या ठगास कासारवडवली पोलिसांनी कोल्हापूरमधूनअटककेली आहे. २४ तासात पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे. या ठगाचे नाव सचिन नारायण गडकरी (२७) असे असून कर्नाटक राज्यातील अत्ताळ येथे राहतो.
कासारवडवली पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली. महिलेने दिलेल्या माहितीनुसार. वांद्रे येथे राहणाऱ्या रितेश पाटील नाव सांगून एअर इंडियात पायलट असल्याची बतावणी करणाऱ्या इसमाने फेसबुक आणि व्हॉटस अॅपद्वारे चॅटिंग करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तक्रारदार महिलेला सरकारने महिलांसाठी जाहीर केलेल्या योजनेची माहिती दिली आणि गोड बोलून तिचा फोटो त्याच्या मोबाईलवर पाठविण्यास तसेच व्हिडीओ कॉल करण्यास भाग पडले. त्यानंतर आरोपीने तक्रारदार महिला आणि तिचे कुटुंबियांना जीवे मारण्याची आणि तक्राद्र महिलेला तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वेळोवेळी एकूण १९ हजार रुपये कॉर्पोरेशन बँकेतील त्याच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. अशा प्रकारे तक्रादार महिलेशी सोशल मीडियावर मैत्री करून नंतर जवळीक साधून तिला ब्लॅकमेल करून पैसे उकळत होता. या घटनेबाबत तक्रारदार महिलेने कासारवडवली पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५४ (ङ) आणि माहिती व तंत्रज्ञान अधिनियमन कायदा कलम ६६ (ड ), ६६ (इ), ६७, ६७ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी तक्रादार महिलेशी बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी सतत मोबाईलवर संपर्कात होता. त्याचे मोबाईल टॉवर लोकेशन कोल्हापूर येथे मिळत होते. त्याप्रमाणे लागलीच पोलीस पथक तयार करून त्यांना आरोपीला पकडण्यासाठी कोल्हापूर येथे धाडण्यात आले. दरम्यान आरोपी कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील कॉर्पोरेशन बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये त्याचा बँक बॅलन्स चेक करण्यासाठी गेला असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही अटक केवळ २४ तासात पोलिसांनी केली आहे. सचिन गडकरी खोट्या रितेश पाटील या नावाने तक्रारदार महिलेशी बोलत असे. अशा प्रकारे त्याने अनेक महिलांना फसविल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.