Home ताज्या बातम्या सौरभ राव यांच्या बदली आदेशाने जोरदार चर्चा

सौरभ राव यांच्या बदली आदेशाने जोरदार चर्चा

0

पुणे : सौरभ राव हे महापालिकेचे 2020-2021 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असतानाच; राव यांची राज्य शासनाने बदली केली आहे. त्यामुळे राव हे अंदाजपत्रक सादर करणार, की पदभार सोडणार याबाबत चर्चा सुरू आहेत. राव यांची पालिकेत दोन वर्षे पूर्ण होण्यास दोन महिने शिल्लक असतानाच त्यांची बदली झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राव यांनी साडेतीन वर्षे पुणे जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी 17 एप्रिल 2018 रोजी पालिकेचा पदभार स्वीकारला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे अधिकारी समजले जात होते. या कालावधीत त्यांनी ई-बस, एचसीएमटीआर रस्ता, जायका नदी सुधार योजना, नदीकाठ विकसन योजना, स्वच्छ सर्वेक्षण 2020 भामा- आसखेड योजना, महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय, पदभरती यासाठी शासनाकडे विशेष पाठपुरावा केला. मात्र, त्यातील ई-बसवगळता इतर प्रकल्पांच्या निविदांवरून राव यांची चांगलीच अडचण झाली होती, त्यात प्रामुख्याने दुप्पट दराने आलेल्या एचसीएमटीआर रस्ता तसेच जायका प्रकल्पांवरून त्यांची कोंडी झाली होती.

दरम्यान, राव हे फडणवीस तसेच खासदार गिरीश बापट यांच्याजवळचे समजले जात असल्याने, राज्यात सत्ताबदलानंतर सुरू असलेल्या बदल्यांमध्ये राव यांचीही बदली होणार हे निश्‍चित समजले जात होते. मात्र, त्याच वेळी ते दोन वर्षांचा कालावधी पूर्ण करतील अशी अटकळही बांधण्यात येत होती.

मात्र, राव यांच्या बदलीचे आदेशही निघाल्याने आता अवघ्या चार दिवसांवर आलेले अंदाजपत्रक विद्यमान आयुक्त मांडणार, की नवनियुक्त आयुक्त मांडणार याबाबत प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तर राव यांची बदली झालेली असली तरी ते महापालिकेचे अंदाजपत्रक मांडल्यानंतरच पदभार सोडतील, असा दावा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.