औरंगाबाद, दिनांक 17 (जिमाका) : कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि स्टार्टअप उपक्रमांतून प्रक्रिया उद्योग व उत्पादन वाढल्याने कृषि क्षेत्राला आर्थिक संपन्नता प्राप्त होईल, असे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड किसान सन्मान योजनेच्या कार्यक्रम प्रसंगी केले.
केंद्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने आयोजित प्रधानमंत्री किसान सन्मान संमेलनास कृषि विज्ञान केंद्र येथे शेतकरी व कृषि विभागाचे अधिकारी कृषि विज्ञान केंद्र येथे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. सहकार व पणन मंत्री अतुल सावे, कृषि विभागाचे सहसंचालक डॉ.दिनकर जाधव, नाबार्डचे श्री. पटवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. देशमुख व कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक डॉ.किशोर झाडे यांच्यासह, कृषि संशोधन परिषद व शेतकरी, महिला या कार्यक्रमास उपस्थिती होत्या.
केंद्र शासनाच्या कृषि विषयक योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आर्थिकदृष्टया सक्षम बनवण्यासाठी बी-बियाणे, कर्ज वाटप, नवनवीन तंत्रज्ञान, किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री विमा योजना यांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.कराड यांनी शेतकऱ्यांना केले. ‘वन नेशन वन फर्टीलायझर’व किसान समृद्धी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी अवजारे, खते, बि-बियाणे, फवारणीची औषधे, व यंत्र सामुग्री उपलब्ध होणार असल्याने याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन डॉ.कराड यांनी केले.
यावेळी सहाकर व पणन मंत्री अतुल सावे म्हणाले की पीक विमा व शेतकरी कर्ज पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी शेतकऱ्यांना केले.
*****