Home ताज्या बातम्या ‘स्टॅन स्वामींवर उपचार सुरूच ठेवावेत’

‘स्टॅन स्वामींवर उपचार सुरूच ठेवावेत’

0
‘स्टॅन स्वामींवर उपचार सुरूच ठेवावेत’

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

कोरेगाव भीमा हिंसाचार व माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोप प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी (८४) यांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी गुरुवारी दिली. त्यामुळे ‘वांद्रेमधील होली फॅमिली रुग्णालय या खासगी रुग्णालयाने स्वामींवर उपचार सुरूच ठेवावेत आणि त्यांच्या प्रकृतीचा ताजा अहवाल न्यायालयात १७ जूनपर्यंत सादर करावा’, असे निर्देश देऊन न्या. संभाजी शिंदे व न्या. निजामुद्दीन जमादार यांनी याविषयीची पुढील सुनावणी १८ जूनला ठेवली.

पार्किन्सन्स व अन्य आजारांनी त्रस्त असलेले ख्रिस्ती धर्मगुरू स्टॅन स्वामी यांचा वैद्यकीय कारणाखालील अंतरिम जामीन अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळल्याने त्यांनी ज्येष्ठ वकील अॅड. मिहिर देसाई यांच्यामार्फत अपील केले आहे. प्रारंभी जे. जे. रुग्णालय किंवा अन्य कोणत्याही रुग्णालयात उपचार घेण्यापेक्षा तळोजा तुरुंगातच मरणे पसंत करेन, असे म्हणणे न्यायालयासमोर मांडणारे स्वामी हे नंतर होली फॅमिली रुग्णालयात उपचारार्थ दाखल होण्यास तयार झाले. त्यानुसार, न्यायालयाने त्यांना तुरुंगातून त्या रुग्णालयात हलवण्याचे निर्देश दिले होते.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर २ दिवसांनी स्वामींना करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याने तूर्तास त्यांना रुग्णालयातच राहू द्यावे, अशी विनंती गुरुवारी झालेल्या सुनावणीत अॅड. देसाई यांनी केली. या विनंतीची दखल घेत खंडपीठाने वरील निर्देश दिले.

Source link