Home अश्रेणीबद्ध स्ट्राँग रूमवर सीसीटीव्ही, सीआयएसएफ जवानांची नजर

स्ट्राँग रूमवर सीसीटीव्ही, सीआयएसएफ जवानांची नजर

0

उल्हासनगर : उल्हासनगर मतदारसंघातील इव्हीएम मशीन प्रांत कार्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ठेऊन सीसीटीव्ही कॅमेरे व सीआयएसएफ जवानांचे संरक्षण असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग मुकदम यांनी दिली.

दरम्यान, सोमवारी मतादानाच्या दिवशी शेवटच्या तासात नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केल्याने अनेक ठिकाणी सायंकाळी आठनंतरही मतदान सुरू होते. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कधी नव्हे ४६.८९ टक्यांवर गेली. यापूर्वी ३८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले नव्हते.

उल्हासनगर मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत २४ टक्के तर पाचपर्यंत ३८ टक्के मतदान झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र पाचनंतर नागरिकांनी मतदानकेंद्रावर एकच गर्दी केली. मतदान केंद्राबाहेर रांगेत उभे असलेल्यांना सायंकाळी सहा वाजता आतमध्ये घेत केंद्राचे प्रवेशद्बार बंद केले.

इव्हीएम मशीन व इतर साहित्य प्रांत कार्यालयात पोहचविण्यासाठी कर्मचाऱ्यांना सोमवारी रात्री १२ वाजले. रात्री एकनंतर सर्व इव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले. स्ट्राँग रूमच्या आतबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून रूमबाहेर सीआयएसएफ जवान, सीआरपीएफ जवानांचे कडे उभारण्यात आले. तर प्रवेशद्बारावर स्थानिक पोलिसांचे संरक्षण ठेवले आहे. मंगळावारी सकाळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक पथकाने निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला.

मुकदम यांनी मंगळवारी दुपारी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यामध्ये उमेदवार व त्या प्रतिनिधींनी विविध सूचना केल्या. अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी पत्र देऊन स्ट्राँग रूम बाहेर व शेजारील मोबाइल टॉवरवर जॅमर लावण्याची मागणी केली. राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योती कलानी यांनी सकाळीच मुख्य पदाधिकाऱ्यांची बैेठक घेऊन निवडणुकीतील माहिती घेतली. भाजपचे कुमार आयलानी यांनीही पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीबाबत माहिती घेतली. रिपाइंचे बंडखोर भगवान भालेराव यांनी सकाळी कार्यकर्त्यांची भेट घेतली.

महिला कर्मचाऱ्यांचे हाल, गोंधळ कायम

शेवटच्या तासात नागरिकांनी मतदान करण्यासाठी एकच गर्दी केल्याने बहुतांश मतदानकेंद्रावर रात्री आठपर्र्यंत मतदान सुरू होते. इव्हीएम मशीनसह इतर साहित्य प्रांत कार्याल्यात आणून ती जमा करण्यासाठी रात्रीचे बारा वाजले. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांना थांबविल्याने त्यांचे हाल झाले. सुदैवाने त्याठिकाणी जेवणाची व्यवस्था केली होती.

महाराष्ट्रात कमी मतदानाची नोंद उल्हासनगरमध्ये होते की काय? अशी परिस्थिती पाचेपर्यंत होती. मतदान आठनंतर सुरू असल्याने टक्केवारीत गोंधळ झाला. अखेर ४६. ८९ टक्के मतदान झाल्याचे जाहीर करण्यात आले. वाढलेली मतदानाची टक्केवारी कुणाच्या पदरात पडणार अशी चर्चा सुरू झाली