प्रभारी ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले यांनी पावसामुळे ग्रंथालयांच्या झालेल्या नुकसानाचे संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी तत्काळ पंचनामे करून हानीची नोंद संबंधित यंत्रणेला कळवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, सध्या ग्रंथालयांपर्यंत पोहोचणेही कठीण होत असल्याचे अनेक ग्रंथालय चालक सांगत आहेत. कोल्हापूरचे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष तानाजी मगदूम यांनी रस्ते बंद असल्याने गावांमध्ये मदत पोहोचणे आणि ग्रंथालय कर्मचारी ग्रंथालयांपर्यंत पोहोचणेही कठीण झाल्याचे सांगितले. पावसाच्या प्रमाणावरून ग्रंथालयांचे किती नुकसान झाले असेल, याचा सध्या केवळ अंदाजच बांधला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह श्रीकृष्ण साबणे यांनी संगमेश्वर शारदा वाचनालय आणि चिपळूणचे लोकमान्य टिळक स्मारक मंदिर पाण्याखाली गेल्याचे सांगितले. चिपळूणमध्ये तर ग्रंथालय पूर्णच पाण्याखाली होते. त्यामुळे तेथील सर्वच पुस्तके भिजली असण्याची भीती व्यक्त केली. मात्र ,नुकसान किती झाले याची कल्पना यायला अजून दोन-तीन दिवस लागू शकतात, असे ते म्हणाले.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या पावसामध्ये सांगली जिल्हा ग्रंथालयासारख्या मोठी परंपरा लाभलेल्या ग्रंथालयातील ग्रंथसंपदेचे मोठे नुकसान झाले होते. या काळामध्ये काही दात्यांनी ग्रंथालयांना मदतही केली. मात्र, या सगळ्या कहरामध्ये आडमार्गाची काही ग्रंथालये मदतीशिवाय राहिली. यंदाही पावसाने केलेल्या कहरामध्ये नदीकाठच्या गावांमध्ये विपरित परिस्थिती आहे. या ग्रंथालयांनाही मदत झाली पाहिजे, असे आवाहन पुणे विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांनी केले. पंचनाम्याची संपूर्ण माहिती हाती येण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, असेही ते म्हणाले.
रत्नागिरी येथील नवनिर्माण महाविद्यालयाचे विद्यार्थी चिपळूण नगर परिषदेच्या आंबेडकर वाचनालयामध्ये पुस्तके चिखलामधून बाहेर काढण्याचे काम करत आहेत. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केला आहे. पाण्यामध्ये भिजलेल्या पुस्तकांचे जतन करण्यासाठी उपाय सांगण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक ग्रंथालयांना अशा जतनासाठी मदत लागू शकते. त्यासाठी सरकारी पातळीवरूनही मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.