आई आपल्या मुलांवर नि:स्वार्थपणे प्रेम करते, अडी-अडचणीत सापडलेल्या मुलाला जिवाची पर्वा न करता संकटातून सहिसलामत बाहेर काढते, हे सर्वश्रुत आहेच, अशीच मातेच्या दातृत्वाची प्रचिती देणारी घटना संभाजीनगर शहरामध्ये घडली आहे. आपल्या मुलांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या मातेने जिवाची पर्वा न करता स्वत:ची किडनी देऊन पोटच्या गोळ्याचे प्राण वाचविले आहेत, अनिता किशोर निकम असे या मातेचे नाव आहे.
संभाजीनगर जिल्हा परिषदेत वरिष्ठ सहायक म्हणून कार्यरत असलेले किशोर रमेश निकम यांचा अठरा वर्षांचा एकुलता एक मुलगा प्रतीक हा काही दिवसांपासून आजारी होता. संभाजीनगर, जळगाव, पुणे व हैदराबाद आदी ठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. अधिक उपचारानंतर त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे लक्षात आले.
दरम्यान, त्यास अधिकच त्रास जाणवू लागला. अलीकडच्या काळात त्याचा हा आजार अधिकच बळावत गेल्याने त्याच्यावर डायलिसिसवर जगण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत पुढे जगणेही त्याला कठीण झाले. कोणी तरी किडनी दान करून त्याचे प्राण वाचविणे महत्त्वाचे होते. मात्र, किडनीदान करणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रतीकची आई अनिता किशोर निकम यांनी मोठ्या धाडसाने आपली स्वत:ची किडनी मुलाला देण्याचा धाडसी निर्णय घेतला. मात्र, दुर्दैवाने आई आणि मुलाचा रक्तगट भिन्न निघाल्याने गुंता निर्माण झाला.
प्रतीकचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह तर आई अनिता यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह असताना सिग्मा हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर्स गणेश बर्नेला, डॉ. सारूक, डॉ. अभय महाजन, डॉ. अरुण चिंचोले आदींनी अथक परिश्रम घेत ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. आईने किडनी दान केल्यामुळे प्रतीकचे प्राण वाचले. ही शस्त्रक्रिया 22 सप्टेंबर रोजी करण्यात आली.
आता या मायलेकराची प्रकृती उत्तम असून, अनिता निकम यांना डिस्चार्ज देऊन घरी पाठविण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मुलासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून अनिता निकम यांनी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या आईच्या रांगेत बसण्याचा बहुमान पटकावला आहे. त्यांच्या या धाडसाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.