हायलाइट्स:
- अभिनेता उज्ज्वल धनगर याचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन
- रुग्णालयात उपचारादरम्यान मालवली उज्ज्वलची प्राणज्योत
- स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत उज्ज्वलनं साकारली होती खाशाबाची व्यक्तिरेखा
अभिनेता उज्ज्वल धनगर हा मूळचा शहापूर तालुक्यातील सापगावचा रहिवासी होता. पण मागची १५ वर्ष तो टिटवाळा येथे राहत होता. उज्ज्वलनं केवळ ‘स्वराज्यरक्षक संभाजी’या मालिकेतच नाही तर ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतही खाशाबाची व्यक्तिरेखा साकारली होती. याशिवाय त्यानं ‘क्राईम पेट्रोल’, ‘लक्ष्य’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे. एक अभिनेता असण्यासोबतच उज्ज्वल एक उत्तम निवेदकही होता. त्यानं अनेक कार्यक्रमासाठी निवेदक म्हणून जबाबदारी पार पाडली होती. उज्ज्वलच्या अशा अकस्मित निधनानंतर त्याच्या सहकलाकारांनाही धक्का बसला आहे.
उज्ज्वलनं शनिवारी ‘क्राइम पेट्रोल’ या हिंदी शोचं शूटिंग पूर्ण केलं त्यानंतर त्यानं नगरसेवक संतोष तरे यांच्यासोबत रविवारी रात्री जेवणही केलं. पण सोमवारी पहाटे ६ च्या सुमारास त्याच्या छातीत दुखायला सुरुवात झाल्यानं तो टिटवाळा येथील महागणपती रुग्णालयात दाखल झाला. सुरुवातील अॅसिडिटी झाल्याचं समजून त्याची औषधं घेऊन तो घरी परत आला मात्र नंतर त्रास वाढत गेल्यानं त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तेव्हा उपचारादरम्यान त्याचं निधन झालं.
उज्ज्वलवर टिटवाळा येथील स्मशानभूमित अंतिमसंस्कार करण्यात आले. दरम्यान उज्ज्वलच्या निधनामुळे त्याचा मित्रपरिवार आणि सहकलाकारांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांनी उज्ज्वलला श्रद्धांजली वाहिली आहे.