हायलाइट्स:
- गाझियाबादमधील वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल
- स्वरा भास्कारसह अनेक सेलिब्रेटींनी या व्हिडीओवर दिली होती प्रतिक्रिया
- स्वरा भास्करनं या व्हिडीओ संदर्भात आक्षेपार्ह ट्वीट केल्याचा आहे आरोप
स्वरा भास्करसह अन्य सेलिब्रेटींच्या विरोधात आरोप आहे की, या सर्वांनी त्या वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याच्या प्रकरणाबाबत आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे. एक वकिल अमित आचार्य यांनी दिल्लीतील टिळक मार्ग पोलिस स्टेशनमध्ये या सर्वांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
बुलंदशहरच्या अनूपशहर येथे राहत असलेल्या ७२ वर्षीय अब्दुल समद सैफी ५ जून रोजी आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गाझियाबादला गेले होते. ते ऑटोमध्ये बसले ज्यात आणखी चार तरुण प्रवासी होते. अब्दुल समद सैफी यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, त्यांच्यावर श्रीराम बोलण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता आणि नकार दिल्यानंतर त्यांची दाढी काढण्यात आली. कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, अब्दुल समद सैफी यांना मारहाण करत असताना त्या रिक्षामध्ये गाणी चालू असल्यानं त्या तरुणांनी अब्दुल समद सैफी यांच्यावर श्रीराम बोलण्यासाठी दबाव घातल्याचं ऐकू येत नाही.
दरम्यान गाझियाबाद पोलिसांनी ट्विटर हॅन्डलवर याची माहिती देत अब्दुल समद सैफी हे ताबीज तयार करण्याचं काम करत होते. ज्यावरून त्यांना मारहाण करण्यात आल्याचं म्हटलं होतं. पण या घटनेवरून अब्दुल समद सैफी यांच्या कुटुंबीयांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. जेव्हा तक्रार करण्यास गेलो तेव्हा पोलिसांनी दोन हजार रुपये देत आम्हाला घरी जाण्यास सांगितल्याचं अब्दुल समद सैफी यांच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे. पोलिसांनी त्यांचा अपमान केला असंही त्यांचं म्हणणं आहे. तसेच अब्दुल समद सैफी हे ताबीज तयार करण्याचं काम नाही तर सुतारकाम करतात असंही त्यांनी सांगितलं.