सांगली दि. 15 (जि.मा.का.) : संयुक्त महाराष्ट्राचा कलश ज्यांनी आणला ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी समाजाला जागृत करुन विकासाकडे नेले. ज्यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडविला अशा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे विचार समाजामध्ये रुजविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार समिती मिरज यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार 2022 बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुरस्कारप्राप्त सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार अनिल बाबर, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील, विशाल पाटील, रोहित आर. आर. पाटील, सुरेश आवटी, किशोर जामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांचे फार मोठे योगदान आहे. अशा थोर व्यक्तींची, त्यांच्या विचारांची नवीन पिढीला माहिती होणे ही काळाची गरज असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. नवीन पिढी ही सोशल मीडियाच्या आहारी जात असून विचारांची देवाणघेवाण कमी होत आहे. नवीन पिढीसमोर आदर्श ठेवण्यासाठी आदर्श व्यक्तींचे विचार, त्यांच्यात रुजविणे ही काळाची गरज झाली आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे असेच उत्तुंग व्यक्तिमत्व असून त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कार्य केले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत होते त्याच मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करणारे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिला गेला हा एक सुवर्ण योगायोग आहे.
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा मी नम्रपणे स्वीकारत आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ज्या मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करत होते. त्याचे मी सध्या प्रतिनिधीत्व करीत आहे. म्हणून हा पुरस्कार मी त्या मतदारसंघातील जनतेला अर्पण करत आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली असून स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या विचाराप्रमाणेच मी पुढील कार्य करीन. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी देशाच्या विकासामध्ये बहुमूल्य काम केले असून त्यांचे काम देशाच्या संरक्षण क्षेत्रातील काम सर्वोत्कृष्ट ठरले. त्यांच्या काळातच त्यांनी सैनिकी शाळा सुरु केल्या त्यांच्या याच विकासाच्या दृष्टीप्रमाणे काम करत राहीन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशवंत स्मृती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार समितीचे सचिव विठ्ठल पाटील यांनी केले यावेळी समितीचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.