स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंधित ठिकाणांना जोडणारे अखिल भारतीय सावरकर सर्किट तयार करावे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन – महासंवाद

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंधित ठिकाणांना जोडणारे अखिल भारतीय सावरकर सर्किट तयार करावे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन – महासंवाद
- Advertisement -

VIRENDRA DHURI

मुंबई, दि. 27 : मुंबई विद्यापीठ हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे शिक्षणाचे स्थळ असून त्यांच्या जीवन आणि कार्याला समर्पित अभ्यास आणि संशोधन केंद्र दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंधित ठिकाणांना जोडणारे अखिल भारतीय सावरकर सर्किट तयार करण्याचे प्रयत्न व्हावे,असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठ येथील सर कावसजी जहाँगीर दीक्षांत सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, यांच्या प्रमुख उपस्थिती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे (ऑनलाइन) उद्घाटन आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४२व्या जयंतीच्या पूर्वसंध्येनिमित्त विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी आमदार अतुल भातखळकर, पराग अळवणी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रविंद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरु अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्यासह प्राध्यापक,विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर विद्वान, कवी, इतिहासकार, पुरोगामी विचारवंत आणि  अग्रणी समाजसुधारक  होते. ते अस्पृश्यतेच्या सामाजिक दुष्कृत्याच्या विरोधात होते. त्यांनी अस्पृश्यतेच्या प्रथेला पाप आणि माणुसकीवरील कलंक मानले. ते रूढीवादाच्या विरोधात उभे राहिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही जातीभेद निर्मूलनासाठी सावरकरांच्या कार्याचे आणि वचनबद्धतेचे कौतुक केले होते.

मुंबई विद्यापीठात स्थापन होत असलेले हे अभ्यास आणि संशोधन केंद्र सावरकरांचे साहित्य, विचार आणि तत्त्वज्ञान यांना प्रोत्साहन देईल तसेच त्यांचा प्रसार करेल असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन

केंद्रासाठी आवश्यक निधी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून सावरकरांचा जीवनप्रवास उलगडेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील विविध पैलूंमध्ये इतकी ताकद होती की, त्यांतील एक-एक पैलूंवर समग्र संशोधन करता येईल. त्यांच्या नावाने मुंबई विद्यापीठात स्थापन संशोधन केंद्रास आवश्यक निधी दिला जाईल.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे आणि ब्रिटिश सरकारविरुद्धच्या कृतीमुळे ब्रिटिशांनी त्यांची बॅरिस्टर पदवी काढून घेतली. ही पदवी परत मिळवण्यासाठी विद्यापीठाने सविस्तर प्रस्ताव तयार करावा. राज्यशासन यासंदर्भात इंग्लंडमधील संबंधित संस्थांशी पत्रव्यवहार करेल आणि त्यांना मरणोत्तर बॅरिस्टर पदवी देण्यासाठी प्रयत्नशील राहील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनप्रवास प्रेरणादायी असून, लहानपणीच स्वातंत्र्यालढ्यात सहभागी होऊन त्यांनी ‘अभिनव भारत’ सारखी संस्था स्थापन केली. इंग्रज ज्याला ‘सिक्रेट सोसायटी’ म्हणत. या संस्थेच्या माध्यमातून भारतीयत्व आणि भारतीय स्वातंत्र्याबाबत जनजागृती, संघटन करून त्यांनी क्रांतीला चालना दिली. विशेषतः जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे त्यांनी भाषांतर केले आणि क्रांतीसंदर्भातील धडे देण्याचे काम केले. सन 1857 च्या युद्धाला सुरुवातीला ‘शिपाई बंड’ असे संबोधले गेले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे पहिले व्यक्ती होते, ज्यांनी या संघर्षाला केवळ शिपायांचं बंड न मानता, तो एक स्वातंत्र्यलढा होता, असे ठामपणे सांगितले. ‘भारतीय इतिहासातील सहा सुवर्णपाने’ या त्यांच्या पुस्तकातून इंग्रजांच्या दडपशाहीखाली दडपलेला इतिहास त्यांनी समाजासमोर आणला. त्यांचा आत्मविश्वास, धाडस आणि निर्णायक कृती आजही प्रेरणादायी ठरते. देशासाठी झगडताना त्यांनी कधीही हार मानली नाही. बौद्धिक, सामाजिक आणि क्रांतिकारी योगदान दिले. आजच्या पिढीसाठी त्यांचे योगदान अत्यंत प्रेरणादायी आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

कलिना कॅम्पसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा उभारणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी पारतंत्र्याविरुद्ध दिलेली झुंज, त्यांचे विचार आणि साहित्य यांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापीठात अभ्यास व संशोधन केंद्र सुरू करण्यात येत आहे. याच परिसरात त्यांचा पुतळा सुद्धा उभारण्यात येणार आहे.  यासाठी जागा उपलब्ध झाली आहे अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

सावरकरांचे क्रांतिकारक रूप सर्वांनाच ज्ञात आहे. मात्र, जेव्हा त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात दोन वर्षांसाठी नजरकैदेत ठेवण्यात आले, तेव्हा त्यांच्यावर प्रक्षोभक भाषणे आणि लिखाण करण्यास बंदी घालण्यात आली होती. त्या काळात त्यांनी सामाजिक समतेसाठी केलेले कार्य फारसे समोर आले नाही. रत्नागिरीतील पतितपावन मंदिराच्या उभारणीत त्यांनी सर्व जातींसाठी मंदिर खुले केले. त्यांनी सामूहिक भोजन आणि आंतरजातीय विवाहाचे आयोजनही केले. सावरकरांचे हे सामाजिक योगदान आणि विचार लोकांपुढे यावेत, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार हे अध्यासन केंद्र उभारण्यात येत आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सामाजिक विचार व्यापक होता. त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी ‘पतितपावन मंदिर ते चैत्यभूमी’ अशी यात्रा काढण्यात आली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करताना म्हटले होते की, देशाला 2047 पर्यंत जगात पहिल्या क्रमांकावर घेऊन जायचे असेल आणि प्राचीन वैभव पुन्हा मिळवायचे असेल तर  गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडले पाहिजे. त्यासाठी भारतीय ज्ञानपरंपरा आणि इतिहास नीट शिकवावा लागेल. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्र नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यातून जगण्याची प्रेरणा मिळते – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

छत्रपती संभाजी महाराज हे प्रेरणा असल्याने ‘राज्य प्रेरणागीत पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर अत्यंत बुद्धिमान आणि बहुभाषिक व्यक्तिमत्त्व होते. मराठीसोबत संस्कृत, हिंदी, इंग्रजी व अन्य भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी साहित्यनिर्मिती, ग्रंथलेखन, कविता आणि विविध प्रकारच्या लिखाणातून अनमोल कार्य केले.  त्यामुळे राज्याच्या प्रेरणागीत पुरस्कारासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्यापेक्षा दुसरे नाव विचारात येणे शक्य नव्हते,  छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यातून आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळते.  स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित मराठी प्रेरणागीत ‘अनादि मी, अनंत मी..’ हे   प्रचंड आत्मबळ असलेले गीत. त्यामुळेच राज्य शासनाने हा पुरस्कार दिला असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी म्हणाले,  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्र, स्वातंत्र्यवीरांच्या लेखनाचा, त्यांच्या उपलब्ध भाषणांचा व त्यांच्या राष्ट्रकार्याचा अकादमिक स्तरावर अभ्यास करेल तसेच त्यावर विद्वत्तापूर्ण चर्चा घडवेल आणि सावरकरांना समर्पित असलेले  केंद्र सामाजिक सुधारणा, स्वातंत्र्य आदी विचारांचा विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधकांच्याद्वारे अभ्यास करेल व त्याद्वारे एक जागतिक विचारमंच प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल. या केंद्राच्या वतीने प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि विद्यावाचस्पती अशा विविध अभ्यासक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषाशुद्धीचा विचार, प्रेम आणि आग्रह लक्षात घेऊन पुढील दोन वर्षात विज्ञान व तंत्रज्ञानातील सर्व अभ्यासक्रमातील विविध अभ्यासक्रमातील आशय हे मराठी भाषेत आणले जाईल. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारांचा अभ्यास करणारे भारतातले पहिलेवहिले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्र हे प्रबळ असावे, सक्षम असावे, संशोधकांना योग्य असं साहाय्य मिळावे या दृष्टीने मुंबई विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाकडे शंभर कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव सादर केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

- Advertisement -