Home ताज्या बातम्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान “घरोघरी तिरंगा” उपक्रम नागरिकांनी घरावर उत्स्फुर्तपणे तिरंगा फडकवावा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान “घरोघरी तिरंगा” उपक्रम नागरिकांनी घरावर उत्स्फुर्तपणे तिरंगा फडकवावा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

0
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान “घरोघरी तिरंगा” उपक्रम नागरिकांनी घरावर उत्स्फुर्तपणे तिरंगा फडकवावा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

जालना दि, 5 (जिमाका) :- देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” अर्थात “घरो घरी तिरंगा” हा उपक्रम संपूर्ण देशभरामध्ये दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या दरम्यान राबविण्यात येणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण ठेवून आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान या निमित्ताने जपला जाणार आहे. जालना जिल्ह्यातील जनतेने या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

घरोघरी तिरंगा या उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत तीन दिवस चालणाऱ्या “घरो घरी तिरंगा” उपक्रमामध्ये जालना जिल्ह्यात शहरी भागात एक लक्ष तर ग्रामीण भागामध्ये 3 लक्ष अशा पद्धतीने एकुण चार लक्ष घरांवर तिरंगा ध्वज फडकेल, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. घरेघरी तिरंगा या अभियानांतर्गत ध्वज संहितेत बदल करण्यात आला असून 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या कालावधीत घरांवर 24 तास तिरंगा ध्वज फडकवता येईल. परंतू शासकीय कार्यालयांसाठी ध्वजसंहिता लागू असणार आहे. यापूर्वी तिरंगा ध्वज हा केवळ खादी कापडापासुन तयार केलेलाच फडकवता येत होता.  परंतू त्यामध्ये बदल करत हा ध्वज खादी अथवा कॉटन, पॉलिस्टर, सिल्क कापड यापासून बनविल्या जाऊ शकतो.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जालना जिल्ह्यात “घरो घरी तिरंगा” हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी या उपक्रमाबद्दल जनमानसांमध्ये प्रभावीपणे जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगत जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, शहरी भागामध्ये शासकीय कार्यालयांसह मोक्याची ठिकाणी तसेच ग्रामीण भागांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात  नागरिकांना तिरंगा झेंडा खरेदी करण्यासाठी झेंडा विक्री केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.  शासनाने ठरवुन दिलेल्या दरानुसारच झेंडा सर्वसामान्यांना उपलब्ध होईल, यादृष्टीने काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असुन प्रत्येकाने स्वयंस्फुर्तीने झेंडा विकत घेऊन आपल्या घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

“घरो घरी तिरंगा” या उपक्रमांच्या जनजागृतीसाठी शहरी भागासह ग्रामीण भागांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या प्रभात फेरीचे आयोजन करण्याबरोबरच  महाविद्यालयीन, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, स्काऊट विद्यार्थी यांच्या माध्यमातूनही प्रभात फेऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाणार आहे.   संपूर्ण जिल्हाभरामध्ये विविध ठिकाणासह शासकीय कार्यालयांमध्ये तिरंगा विषयक पोस्टर, बॅनर्स, स्टॅंडिज, होर्डिंग लावण्याच्या सूचना यत्रणांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील चित्रपटगृहामध्ये “घरो घरी तिरंगा”  विषयक गाणी, जिंगल प्रसारित करण्याबरोबरच जिल्ह्यातील एस.टी. महामंडळाच्या बसस्थानकावरुनही जिंगल्सचे प्रसारण,  बसेसवर बॅनर्स  लावण्यात येणार आहेत.  देशभक्तीपर गीत, समूह नृत्य, समूहगान, प्रश्नमंजुषा आदी उपक्रमही शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणार आहेत.

तिरंगा फडकवत असताना ध्वजसंहितेचे प्रत्येक नागरिकाने काटोकोर पालन करण्याचे आवाहन करत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की,   राष्ट्रीय ध्वज सन्मानपूर्वक फडकविला जाईल याची दक्षता घ्यावी. राष्ट्रीय ध्वज हाताने कातलेला, हाताने बनविलेला किंवा मशीनव्दारे तयार केलेल्या सुत/ पॉलिस्टर/लोकर/सिल्क व खादी कापडापासून तयार केलेला असावा. राष्ट्रीय ध्वजाचा आकार आयताकृती असेल व झेंड्याची लांबी व रुंदी ३:२ या प्रमाणात राहील. शासनाच्या सुचनेनुसार राष्ट्रीय ध्वज दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२२ हे तीन दिवस घरोघरी फडकवितांना दररोज सायंकाळी खाली उतरविण्याची आवश्यकता नाही. परंतु कार्यालयांना यासंबंधी ध्वज संहिता पाळावी लागेल. राष्ट्रीय ध्वज फडकवितांना केशरी रंग आकाशाकडे वर असावा तर हिरवा रंग जमिनीच्या दिशेने खाली असावा. राष्ट्रीय ध्वज चढवितांना लवकर चढवावा व उतरविताना सावकाश उतरावावा. राष्ट्रीय ध्वजाच्या दोन्ही बाजूस समान पांढऱ्या पट्टीच्या पूर्णतः मध्यभागी २४ आ-यांचे नेव्ही ब्ल्यू रंगाचे अशोक चक्र दिसेल, असा ध्वज असावा.

राष्ट्रीय ध्वजावर कोणतेही प्रकारचे अक्षर लिहू नये व ध्वजाचा “केशरी रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल अशाप्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावता येणार नाही.  राष्ट्रीय ध्वज जाणूनबुजून जमिनीवर अथवा पाण्यात पडणार नाही याबाबत दक्षता / काळजी घ्यावी. राष्ट्रीय ध्वजाचा वापर इमारत, टेबल अथवा कोणतीही वस्तू झाकण्यासाठी करता येणार नाही. राष्ट्रीय ध्वजाचा वापर व्यवसायासाठी करता येणार नाही.  खराब झालेला, फाटलेला, मळलेला व चुरगळलेला ध्वज फडकविता येणार नाही. राष्ट्रीय ध्वजाचा वापर कोणत्याही सजावटीसाठी करू नये.  तिरंगाच्या ध्वज स्तंभावर अन्य कोणताही ध्वज किंवा ध्वजासोबत एकाच काठीवर फडकविता येणार नाही. तसेच राष्ट्रीय ध्वजाच्या उंचीवर अथवा समान उंचीवर अन्य कोणताही ध्वज फडकविता येणार नाही. राष्ट्रीय ध्वजाचा वापर हातपुसणे, वाहन पुसणे, हातरुमाल, उशी व पोशाख म्हणून करता येणार नाही. राष्ट्रीय ध्वजाच्यावर किंवा समान स्तरावर कोणताही पताका, बोधचिन्ह,फुलांचा हार व इतर ध्वज एकाच काठीवर लावता येणार नाही.  राष्ट्रीय ध्वज फाटेल अशा पद्धतीने लावू अथवा बांधू नये.  राष्ट्रीय ध्वज फडकवितांना काठीच्या वरील बाजूस टोकावर फडकविणे, मध्यभागी किंवा खाली फडकवू नये. राष्ट्रीय ध्वजापेक्षा उंच किंवा राष्ट्रध्वजाच्या वर किंवा त्याच्या बरोबरीने अन्य कोणताही ध्वज किंवा पताका लावू नये.  राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होणार नाही, यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. अशी माहितीही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यावेळी दिली. जिल्हयातील सर्व जनतेने  “घरो घरी तिरंगा” या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन डॉ. राठोड यांनी शेवटी केले.