सातारा दि. 13: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या स्वातंत्र्याचे गाऊ गान हा सांस्कृतिक कार्यक्रम स्तुत्य असा आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात उत्साहात साजरा होत आहे. जिल्हावासियांनी हा महोत्सव आनंदाने व उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सावानिमित्त जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात स्वातंत्र्याचे गाऊ गान या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री श्री. देसाई बोलत होते. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर आदी उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, स्वातंत्र्यासाठी ज्यानी आपले बलिदान दिले त्यांचे स्मरण ठेवले पाहिजे. मुले हे देशाचे भविष्य आहे. मुलांनीही आपल्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. शिक्षकांनी मुलां-मुलींमधील गुण ओळखून त्याला वाव दिला पाहिजे. शिक्षक हे पिढी घडविण्याचे काम करीत असतात त्यांनीही आपल्या कामात बदल केले पाहिजेत. त्यासाठी आधुनिक शिक्षणाची जोड दिली पाहिजे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करावा, असेही आवाहनही त्यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सावांतर्गत स्वराज्य महोत्सव राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दि.9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. या अंतर्गत स्वातंत्र्याचे गाऊ गान या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 11 तालुक्यातील 11 शाळांनी सहभाग घेतला असल्याचे प्रास्ताविकात श्री. गौडा यांनी सांगितले.
या सांस्कृतिक कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थींनी, विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.