नागपूर, दि. 13 : नागपूर, दि. 13 : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. समाजातील सर्व घटकांना सामावून घेवून जास्तीत जास्त उपक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी आज दिल्या. या महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी आयोजित नागपूर विभागाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, सामान्य प्रशासन उपायुक्त आशा पठाण, विकास उपायुक्त विवेक इलमे, माहिती संचालक हेमराज बागुल, नागपूर महानगर विकास प्राधिकरणचे अपर आयुक्त अविनाश कोल्हे, महापालिका उपायुक्त रवींद्र भेलावे, पोलीस उपायुक्त चेतना तिडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्धन भानुसे, विभागीय कृषि सह संचालक रवींद्र भोसले, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार (वर्धा), संजय मीना (गडचिरोली) यांच्यासह विभागातील इतर जिल्ह्यांचे अधिकारी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातील एका ऐतिहासिक शाळेचा विकास करावयाचा आहे. अशा शाळेची निवड करून त्याठिकाणी करावयाच्या कामांचे स्वरूप, अपेक्षित खर्च याविषयीची माहिती सर्व जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावी. तसेच हुतात्मा स्मारकांची डागडुजी, सुशोभीकरण करण्याची कार्यवाही 8 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी. जिल्ह्यातील प्रमुख शासकीय इमारतींवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे बोधचिन्ह प्रदर्शित करावे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, तृतीयपंथीय यांच्यासाठी विशेष शिबिरे घेवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना डॉ. खोडे-चवरे यांनी दिल्या.
राज्यात 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘स्वराज्य महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्हास्तरावर नियोजन करावे. ‘हर घर झेंडा’ उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक जनजागृती करावी. नागरिकांना भारतीय ध्वज संहितेची माहिती देवून घरावर, शासकीय कार्यालयांवर राष्ट्रध्वज लावण्याबाबत आवाहन करावे. जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यावर रस्ते संग्रहालय उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करावे. जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष उपक्रम राबविण्यासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावा, असे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी आर. विमला, प्रेरणा देशभ्रतार, संजय मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुंभेजकर यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.