Home शहरे अकोला हतनूर प्रकल्पातील उर्वरीत १२ गावांच्या पुनर्वसनाचा नव्याने प्रस्ताव सादर करा – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

हतनूर प्रकल्पातील उर्वरीत १२ गावांच्या पुनर्वसनाचा नव्याने प्रस्ताव सादर करा – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

0
हतनूर प्रकल्पातील उर्वरीत १२ गावांच्या पुनर्वसनाचा नव्याने प्रस्ताव सादर करा – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, दि. 26 : जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पातंर्गत ३४ गावे प्रकल्पबाधित असून हतूनर प्रकल्पातील मुळ अहवालानुसार कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये नव्याने १२ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने सुस्पष्ट प्रस्ताव सादर करा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

श्री.वडेट्टीवार यांच्या मंत्रालयासमोरील सिंहगड निवासस्थानी जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पातील रखडलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चिमणराव पाटील, पुनवर्सन विभागाचे उपसचिव धनंजय नायक, जळगावचे अपर जिल्हाधिकारी तथा पुनर्वसन प्रशासक प्रवीण महाजन, रविंद्र भारदे, कार्यकारी अभियंता आदिती कुलकर्णी, नाशिक महसूलचे उपायुक्त गोरस गाडीलकर यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, शासनाने ३४ गावे पुनर्वसीत करण्यासाठी ४० कोटी रूपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. या ३४ गावांमध्ये काही नागरी सुविधांची कामे पूर्ण झालेली आहेत. पुनर्वसन गावांतील अपूर्ण कामे तसेच ज्या कामांची दरवाढ झाली असून या कामांसाठी लागणारा अतिरिक्त निधी, नव्याने जी गावे पुनर्वसनामध्ये समाविष्ट करायची आहेत, त्या १२ गावांचा सुस्पष्ट प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. ही कामे वेगोने पूर्ण करून या पुनर्वसीत गावांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी दिली.

हतनूर प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाच्या कामांना निधी उपलब्ध करून द्यावा – मंत्री गुलाबराव पाटील

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, हतनूर प्रकल्पातील पुनर्वसीत गावांतील नागरी सुविधांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत तसेच शासनाकडून या ३४ गावांच्या कामासाठी ४० कोटी रूपयांची तरतूद केली होती, मात्र दरवाढीमुळे या कामांसाठी अधिकचा निधी लागणार आहे. त्याचबरोबर हतनूर प्रकल्प पुनर्वसनअंतर्गत नव्याने १२ गावांचाही विकास होणे अत्यंत आवश्यक आहे.या कामांना तातडीने निधी देवून ही कामे गतीने पूर्ण करावीत, अशी मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांनी केली.

*****