अकोला,दि.5 (जिमाका)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ हे अभियान दि.13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत आहे. नागरिकांसाठी तिरंगा ध्वज अकोला येथील पोस्ट कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे. 25 रूपये प्रती ध्वज याप्रमाणे यासाठी दर आकारण्यात आले आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारत सरकार तर्फे हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. देशप्रेम, त्याग, बलिदान ही मुल्ये रुजविण्यासाठी प्रत्येक घरावर भारतीय तिरंगा ध्वज फडकविण्यासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डाकविभागाचे प्रवर डाक अधीक्षक यांनी केले आहे.
अकोला डाकविभागातील सर्व शहरी आणि ग्रामीण पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सोमवार दि. 8 पासून सर्व नागरिकांना तसेच कार्यालयांना तिरंगा झेंडा केवळ 25 रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. पोस्टमनच्या माध्यमातून झेंडा घरपोच देण्यात येणार आहे. त्याकरिता नागरिकांनी तिरंगा झेंडा ऑनलाइन पद्धतीने epostoffice.gov.in या संकेत स्थळावर मागणी नोंदवावी. अकोला डाकविभागातील एक हेड पोस्ट ऑफिस, एक मुख्य डाकघर, 44 उप डाकघर आणि 354 शाखा डाकघर यांच्या माध्यमातून नागरिकांना तिरंगा झेंडा उपलब्ध करून दिला जात आहे. यासाठी अकोला डाकविभागातील सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
सर्व नागरिकांनी पोस्ट ऑफिस मधून तिरंगा झेंडा खरेदी करावा. तिरंगा झेंडा सोबत सेल्फी घेऊन तो सोशल मिडिया वर अपलोड करावा. सेल्फी बोर्डची व्यवस्था डाकघर मध्ये करण्यात आली आहे. त्या करीत खालील हॅशटॅग चा वापर करावा. #IndiaPost4Tiranga #HarGharTiranga #AmritMahotsav. हर घर तिरंगा या 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी करावे, असे आवाहन अकोला डाकविभागाचे प्रवर डाक अधीक्षक यांनी केले आहे.
000