Home शहरे अकोला हवाई क्षेत्रातील करिअरमध्ये उंच झेप घ्या – क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार

हवाई क्षेत्रातील करिअरमध्ये उंच झेप घ्या – क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार

0
हवाई क्षेत्रातील करिअरमध्ये उंच झेप घ्या – क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार

नागपूर, दि. 26 : नागपूरच्या मानकापूर विभागीय क्रीडा संकुलाच्या आसमंतावर रविवारी पहाटे एरोमॉडेलिंगचा थरार अनुभवायला मिळाला. 10 हजार शाळकरी विद्यार्थ्यांचा उत्साह आणि विविधांगी आयोजनाने आजचा रविवार संस्मरणीय ठरला.

विद्यार्थ्यांना हवाई क्षेत्रातील विविध करिअरच्या संधींची माहिती व्हावी. हवाई क्षेत्रात करिअर घडवून आकाशामध्ये विमानाप्रमाणे उंच भरारी घेता यावी तसेच देशाच्या लष्करी सेवा व राष्ट्रीय छात्र सेनामध्ये भरती होण्यासाठी ‘एरोमॉडेल शो’चे आयोजन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या पुढाकारात करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी हवाई क्षेत्राचे करिअर निवडून त्यात मेहनतीच्या जोरावर उंच झेप घ्यावी, असे आवाहनही श्री. केदार यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात आज  क्रीडा विभाग, राष्ट्रीय छात्र सेना व विदर्भ एरोस्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एरोमॉडेलिंग शो’चे श्री. केदार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रक्ष्मी बर्बे, आमदार विकास ठाकरे, अभिजित वंजारी, राजेंद्र मुळक, माजी पालकमंत्री सतिश चतुर्वेदी, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, एनसीसीचे मेजर जनरल वाय. पी. खंडोरी, ब्रिगेडिअर एस. लाहेरी, कॅप्टन (नौसेना) सतपाल सिंग, कॅप्टन (एव्हीएशन) प्रवीण शर्मा, क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, यांच्यासह भारतीय एव्हीएशन विभाग व एनसीसीचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रांगणात सर्वत्र विद्यार्थ्यांची मोठ‌्या संख्येने उपस्थिती होती.

श्री. केदार म्हणाले की, कोरोना महामारीच्या संकटकाळात दोन वर्षे मुले मैदानी खेळापासून वंचित झाली होती. शाळकरी मुलांना मैदानी खेळात निपुणता मिळावी, त्यांना मोकळा श्वास घेता येऊन विमानाप्रमाणे आकाशात उंच भरारी घेता यावी, यासाठी एरोमॉडेल शोचे आयोजन करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये नागपूरातील एनसीसीच्या सात कॅडेटसनी सक्रीय सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तब्बल आठ वर्षानंतर हा मान पुन्हा महाराष्ट्र राज्याने पटकाविला आहे. विद्यार्थ्यांना शालेय दशेत देशप्रेम, राष्ट्रभक्ती, लष्कर सेवा तसेच एनसीसी सेवा याविषयी गोडी निर्माण होण्यासाठी या क्षेत्रातील विविध करिअरच्या संधीची माहिती होऊन भरती होण्याची ईच्छा होण्यासाठी एरोमॉडेल शोचे आयोजन करण्यात आले आहे, असे श्री. केदार यांनी सांगितले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तिरंगी रंगाचे फुगे आकाशात सोडून शोचा शुभारंभ झाला. त्यानंतर एनसीसीच्या कॅडेटसव्दारे हॉर्स रायडींगचे अडथडे पूर्ण करणारे चित्तथरारक कर्तब सादर करण्यात आले. एनसीसीच्या कॅटेटसव्दारे छत्रपती शिवाजी महाराजांचे भारुड, देशभक्तीपर गीतांच्या तालावर नृत्य या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. कार्यक्रमांच्या विविधांगी सादरीकरण होतेवेळी विद्यार्थ्यांकडून प्रत्येक प्रसंगी मिळणाऱ्या प्रतिसादामुळे संपूर्ण आसमंत देशभक्तीमय झाले होते. विद्यार्थ्यांचा जोष व उत्साह हा पाहण्याजोगा होता. विविध मॉडेल्ससोबतच एनसीसीच्या छोट्या विमानांनी जेव्हा मानकापूर स्टेडीयमवर भरारी घेतली तेव्हा चिमुकल्यांचा उत्साहाला उधान आले होते. आपापल्या शाळांचे गणवेश, शाळांचे ग्रुप आणि प्रत्येक घटनाक्रमाला मिळणारा प्रतिसाद भारावून टाकणारा होता. मुलांसोबत त्यांच्या पालकांनीदेखील गर्दी केली होती. शोचा प्रत्येक प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये साठविण्यासाठी लहान मुलांची व पालकांची होळ लागलेली होती. राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण आणि एनसीसी विभागाने अतिशय नीट-नेटके आणि भव्य आयोजन केले होते.

यावेळी 4 कोटी 69 लक्ष रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या पॅव्हेलियन ॲथलेटिक्स बिल्डींगचे मंत्री श्री. केदार यांच्या हस्ते थाटात लोकार्पण करण्यात आले. या शोमध्ये एनसीसीतर्फे 25 विविध एरोमॉडल्सचे आकाशात विविधांगी प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये चुक ग्लायडर, क्याटापुल्ट ग्लायडर, सीएल एरोबॅक्टीक्स, आरसी ग्लायडर, स्काय सरफर, सुखोई, डेल्टा विंग, फ्लाइंग सॉसर,  फ्लाइंग कॅडेट, पॅरामोटर, इलेक्ट्रीक जेट मॉडेल- एफ 18, मायक्रोलाईट, मल्टीकॉप्टर, स्नुपी, काओस आदी एरोमॉडेल्सचा सहभाग होता. एनसीसीच्या टुसीटर ‘मायक्रोलाईट वायर’ विमानाचे प्रत्यक्षरित्या मानकापूर स्टेडीयमवरुन अगदी जवळून पथ संचलनाने विद्यार्थ्यांची मने जिंकून घेतली.

या एनसीसी कॅडेटसचा झाला सत्कार :

प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये नागपूरातील एनसीसीच्या सात कॅडेटसनी सक्रीय सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. आज मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

त्यात 20 महाराष्ट्र बटालियनचे एसयुओ मनिष वावरे, हर्ष पुरी, मयंक चिचुलकर, 4 महाराष्ट्र बटालियनचे ओम झाडे, 2 महाराष्ट्र बटालियनच्या जेयुओ श्रुती ओझा, 2 महाराष्ट्र आर्मस्कॉडनच्या एसयुओ प्रिया मिश्रा, 4 महाराष्ट्र बटालियच्या एसयुओ तृशाली कुथे यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच पालखाडी भारत ते श्रीलंका 30 किमी अंतर 9 तास 20 मिनिटात पूर्ण करुन जगातील दुसरा वेगवान सागरी जलतरण पटू ठरलेला कॅडेट नेव्हल युनिटचा जयंत दुबळे, राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविणारा कॅडेट अमोद शाह, खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत सहावा क्रमांक प्राप्त केलेला कॅडेट रिषिका बोदेले हिचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

*****