मुंबई, दि. २५ :- देशाचं स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, देशाचं संविधान, देशातली लोकशाही, देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी प्राणांची आहूती देणाऱ्या भारतमातेच्या सुपुत्रांसमोर नतमस्तक होण्याचा आजचा दिवस असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
देशाच्या महान स्वातंत्र्यसैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागातून मिळालेलं स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्याचं सामर्थ्य केवळ आपल्या संविधानात, लोकशाही व्यवस्थेत आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांमध्ये आहे. त्यामुळे आपलं संविधान, लोकशाही, सर्वधर्मसमभावाच्या विचाराचं संरक्षण, संवर्धन करण्यासाठी दृढसंकल्प होऊया, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रवासियांना केलं आहे.
देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या मागील ७६ वर्षांच्या वाटचालीत या देशातल्या शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, शिक्षक, संशोधक, सैनिक, साहित्यिक, खेळाडू, कलावंत अशा अनेकांनी आपापल्या परिश्रमाने देशाचा गौरव वाढवला. देशातल्या प्रत्येक व्यक्तीनं देशाच्या प्रगतीत, जडणघडणीत योगदान दिलं. हा देश प्रत्येक देशवासियाचा आहे. आपल्या सर्वांच्या एकजुटीतूनंच आजचा बलशाली भारत भक्कमपणे उभा आहे. ही एकजूट अशीच कायम ठेवूया, असं निर्धारयुक्त आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रजासत्ताकदिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात केलं आहे.
—–०००००—–