हिंगोली येथे पत्रकार व दुर्बल घटकांसाठी घरे, क्रीडा संकुल आणि नानाजी देशमुख स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्या -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १९ – हिंगोली शहरात कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे उपयुक्त उपक्रम प्रभावीपणे सुरू करावेत. त्याचबरोबर हिंगोली शहरात पत्रकार व दुर्बल घटकांसाठी म्हाडामार्फत घरकुल योजना, जिल्हा क्रीडा संकुल तसेच नानाजी देशमुख स्मारक या तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तातडीने प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

    महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या तीनही प्रकल्पांसाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून जमीन उपलब्धतेची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. हिंगोली शहराच्या हद्दीत महसूल विभागाची जमीन उपलब्ध नसल्याने विविध विभागांच्या ताब्यात असलेल्या जमिनींची अदलाबदल करून प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. या बैठकीस आमदार तानाजी मुटकुळे आणि हिंगोलीचे जिल्हाधिकारी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

    पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविण्याच्या मागणीच्या अनुषंगाने सध्या पशुसंवर्धन विभागाकडे असलेली तीन एकर जागा म्हाडाला उपलब्ध करून द्यावी. या जागेवर पत्रकारांसाठी स्वतंत्र वसाहत तसेच दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याचे नियोजन करावे, असे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले. यासाठी पशुसंवर्धन विभागाला आवश्यक असलेली महसूल विभागाच्या ताब्यातील गावाबाहेरील उपयुक्त जागा देण्याबाबत प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर करावा. या प्रस्तावास पशुसंवर्धन विभागाची मान्यता घेऊन तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    क्रीडा संकुलासाठी जागा

    हिंगोलीतील सध्याचे क्रीडा संकुल शहराबाहेर असल्याने शहरातील कृषी विभागाच्या ताब्यातील आणि क्रीडा संकुलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर संकुल उभारण्याबाबत कार्यवाही करावी. त्यासाठी कृषी विभागाला पर्यायी ठिकाणी जमीन उपलब्ध करून देऊन संबंधित जागा जिल्हा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असेही महसूल मंत्र्यांनी सांगितले.

    नानाजी देशमुख स्मारकासाठी तीन एकर जागा

    नानाजी देशमुख स्मारक उभारण्यासाठी तीन एकर जागेची आवश्यकता आहे. यासाठी प्रस्तावित जागा नगरपालिकेच्या नावाने हस्तांतरित करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असेही मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे उपयुक्त उपक्रम प्रभावीपणे सुरू राहण्यासाठी आवश्यक असल्यास त्यांना अतिरिक्त जागाही उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले.

    ०००००

    बी.सी.झंवर/विसंअ

    - Advertisement -