Home शहरे मुंबई हित पाहणारा ‘रोहित’, दहावीत 90 टक्के मिळवणाऱ्या अनुजाच्या शिक्षणाचा खर्च उचलला

हित पाहणारा ‘रोहित’, दहावीत 90 टक्के मिळवणाऱ्या अनुजाच्या शिक्षणाचा खर्च उचलला

मुंबई : शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार हे राजकारणात चांगलेच सक्रीय झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार निवडणूक लढविणार असल्याचंही बोललं जात आहे. त्यासाठी, त्यांनी स्वत:ही कबुली दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित यांचे दौरे वाढले आहेत. रोहित यांनी नुकतेच एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. शेतकरीकन्या अनुजाचे हित पाहत रोहित यांनी दहावीनंतरचा तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला आहे.   

अनुजा रोडे लहान असताना तिच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. या दुख:द घटनेला 7 वर्षे झाली. स्वतःच्या शेतात राबून आणि शिक्षणाला हातभार लागावा म्हणून लोकांच्या शेतात मोलमजुरी करून मुलांच्या शिक्षणासाठी अनुजाच्या आई किसनाबाईंनी खुप परिश्रम केले.
दहावीमध्ये ९०.८०% गुण मिळवून अनुजा उत्तीर्ण झाली आणि वर्गात दुसरा क्रमांक पटकावला. अनुजाने कुठल्याही सुविधा नसताना इतकं मोठं यश मिळवलं आहे. अनुजाच्या या यशस्वी भरारीबद्दल रोहित पवार यांनी तिचं अभिनंदन केलं. अनुजाला पुढचे शिक्षण पूर्ण करायची इच्छा होती पण आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे, जेव्हा रोहित यांना कार्यकर्त्यांकडून याबाबत माहिती मिळाली की, अनुजाला तिचे स्वप्न पूर्ण करण्यात अडथळे येत आहेत. तेव्हा रोहितने अनुजाला मदत करायचा निर्णय घेतला. रोहित यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत अनुजाच्या घरी जाऊन कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर अनुजाच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली. तसेच, अनुजाला यापुढे निर्धास्तपणे पुढील शिक्षण घेण्यास सांगितले. रोहित यांच्या या पुढाकाराने अनुजाच्या आईला अत्यानंद झाला आहे. तर अनुजाचे कुटुंब गहिवरुन आले.