हुबेहुब आवाज काढून तोतया दाजीबाने लुटले दोन लाख

हुबेहुब आवाज काढून तोतया दाजीबाने लुटले दोन लाख
- Advertisement -

म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : कस्टम विभागात कार्यरत असलेल्या निरीक्षकाच्या पत्नीला नणंदेच्या पतीचा उत्तर प्रदेशहून फोन आला. मोबाइल क्रमांक वेगळा असला तरी हुबेहूब आवाज आणि बोलण्याची तीच पद्धत. ‘दाजी बोलतोय’ असे सांगणाऱ्या या व्यक्तीने मित्राचा मुलगा रुग्णालयात असल्याचे सांगून त्याच्या उपचारासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. महिलेने पतीला कल्पना देऊन बँक खात्यामधून पैसे ट्रान्स्फर केले. पैसे मिळाल्याबद्दल विचारणा करण्यासाठी निरीक्षकाने संपर्क केला असता, दाजींनी असा फोनच केला नसल्याचे उघडकीस आले.

कस्टम निरीक्षक आपली पत्नी आणि मुलांसह पवईत राहतात. ८ जून रोजी त्यांची पत्नी रूपा (बदललेले नाव) हिला एका मोबाइल क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने दाजी बोलत असल्याचे सांगितले. आवाजावरून नणंदेचे पती बोलत असल्याचे रूपा हिच्या लक्षात आले. तिने घरच्यांबाबत जाणून घेतले आणि कशासाठी फोन केला, अशी विचारणा केली. यावर दाजींनी ‘मित्राचा मुलगा खूप आजारी असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माझ्या बँक खात्याचा तांत्रिक बिघाड झाला असल्याने पैसे ट्रान्स्फर होत नाहीत. दोन लाख रुपयांची गरज आहे’, असे सांगितेल. यावर पतीला विचारून सांगते, असे रूपा म्हणाली. तिने पतीला याबाबतची कल्पना दिली आणि पतीने होकार देताच तिने पुन्हा दाजींना संपर्क केला. दाजींनी मित्राच्या बँक खात्याचा तपशील रूपा हिला पाठविला. रूपा यांनी सुरुवातीला दाजींच्या मित्राला पेटीएम व गुगल पेद्वारे ९० हजार रुपये पाठविले. स्वतःच्या खात्यामध्ये कमी रक्कम शिल्लक असल्याने रूपा हिने पतीच्या बँक खात्यातून उर्वरित रक्कम ट्रान्स्फर केली.

आणखी फसवणूक टळली

दोन लाख रुपये मिळाल्यानंतर तोतया दाजींनी पुन्हा फोन केला आणि महिलेकडे अडीच लाख रुपये आणखी मागितले. हे समजल्यावर रूपा हिच्या पतीने दाजींना फोन केला. आपण असा कोणताच फोन केला नाही किंवा कुणी रुग्णालयातही दाखल नसल्याचे दाजींनी सांगताच पत्नीला फसविल्याचे कस्टम निरीक्षकाच्या लक्षात आले. त्याने याबाबत पवई पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यांनी दिलेल्या मोबाइल क्रमांक आणि ज्या खात्यावर पैसे वळविण्यात आले त्यावरून पोलिस फसविणाऱ्याचा माग घेत आहेत.

Source link

- Advertisement -