
मुंबई, दि. २३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार जाहीर करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहीमेंतर्गत राज्याच्या सर्व महसुली विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या राज्यातील विभागस्तरावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक (माहिती) कार्यालय, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाने तर जिल्हास्तरावर लातूर जिल्हा माहिती कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात राज्याच्या सर्व महसूली विभागातील ४० विभागस्तरीय कार्यालये व सर्व जिल्ह्यातील ४२ जिल्हास्तरीय कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल आज जाहीर केला. संकेतस्थळ सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर या सर्वच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे अभिनंदन करुन पुढील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
संकेतस्थळ सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर सर्वच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल सर्व कार्यालयप्रमुखांचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी देखील अभिनंदन केले आहे.
विभागीय स्तरावरील कार्यालयांमध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे छत्रपती संभाजीनगर येथील संचालक (माहिती) कार्यालयास प्रथम क्रमांक, अमरावती येथील उपसंचालक माहिती कार्यालयास द्वितीय क्रमांक, नागपूर येथील संचालक (माहिती) कार्यालयास तृतीय क्रमांक मिळाला आहे.
जिल्हा स्तरावरील कार्यालयांमध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लातूर येथील जिल्हा माहिती कार्यालयास प्रथम क्रमांक, कोल्हापूर येथील जिल्हा माहिती कार्यालयास द्वितीय क्रमांक, सातारा आणि परभणी जिल्हा माहिती कार्यालयास तृतीय क्रमांक मिळाला आहे.
0000