१० लाखांच्या बनावट नोटांसह तिघांना अटक
समाज माध्यमावरील चित्रफीत पाहून स्वत:च्या घरातच बनावट चलनी नोटा छापण्याचा प्रकार इचलकरंजीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी आज अटक केले असून त्यांच्याकडून १० लाख रुपयांच्या बनावट नोटांसह कलर प्रिंटर, शाई, दोन मोबाइल व १४ सीमकार्ड असा मुद्देमालही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
जीवन धोंडीबा वरुटे (वय २४), सागर शिवानंदन कडलगे (वय २१), रोहित राजू कांबळे (वय १९) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर बेकायदेशीर रीत्या पैशाचे वाटप तसेच बनावट नोटा चलनात येण्याची शक्यात असल्याने अशा टोळ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाने ही कारवाई केली आहे.
इचलकरंजीत एक तरुण २ हजार रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खपवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी वरुटे याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. या वेळी त्या ठिकाणी संगणक, प्रिंटर, स्कॅनर, रंगीत शाई असे साहित्य त्यांना सापडले. अधिक चौकशी केल्यावर इथे बनावट नोटा तयार करण्याचे रॅकेट चालू असल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी या साहित्य आणि बनावट नोटांसह वरुटे, कडलगे, कांबळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ५०० च्या ५६५, २ हजाराच्या २६०, २०० च्या ४९० , १०० च्या जुन्या व नव्या अशा प्रकारच्या ५३५ अशा १० लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या.