हायलाइट्स:
- १६ वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर हत्या
- आरोपींनी मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा संशय
- बिहारमधील बेगुसरायमधील धक्कादायक घटना
- पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात, गुन्ह्याची कबुली
गढहारा ओपी येथील एका गावातील १६ वर्षीय मुलगी शेजारी लग्नसोहळ्याला गेली होती. मात्र, ती परतली नाही. तिचा सर्वत्र शोध घेतल्यानंतरही सापडली नाही. मुलीच्या कुटुंबीयांनी त्याच रात्री पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. शोध सुरू असतानाच, दुसऱ्या दिवशी गढहारा यार्डाजवळ मुलीचा मृतदेह सापडला. २९ एप्रिल रोजी स्थानिकांनी गढहारा यार्डातील एका स्टोरजवळील खोलीत मृत मुलीची चप्पल आणि कपडे पाहिले. त्या ठिकाणी असलेल्या तिघांना त्यांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. स्थानिकांनी संताप व्यक्त करतानाच, संशयित तरुणांच्या दुचाकींची तोडफोड केली होती. या तीन तरुणांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर एक जण करोनाबाधित असल्यामुळे त्याला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
दोघांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सहा जणांनी मुलीचे अपहरण केले. त्यानंतर एका पडीक घरात नेऊन तिची हत्या केली. तिचा मृतदेह रेल्वे यार्डात फेकले. पोलिसांनी दोन्ही आरोपींची करोना चाचणी करून घेतली. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींनी मुलीचे अपहरण आणि तिच्या हत्येची कबुली दिली आहे. या घटनेतील इतर आरोपींच्या अटकेसाठी छापे मारत आहोत, असे गढहारा ओपी पोलिसांनी सांगितले.