नवी दिल्ली : एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. मात्र या निर्णयावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. तर प्रकाश आंबेडकरांनीही एनआयएकडे तपास देणे चुकीचा आहे. देशद्रोहाच्या कारवाई केल्या असं कुठेही नाही, हे प्रकरण फ्रॉड आहे हे बोलण्याची हिंमत हवी होती असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
झी २४ तासशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात, गृहमंत्री शिफारस करतात, गृहमंत्र्यांनी आपलं मत फाईलवर नोंदवलं पण मुख्यमंत्र्यांनी अधिकार वापरत हा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय घेतला. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या बोलणी झाली असं दिसतं नाही, गृहमंत्र्यांचे वेगळं मत, मुख्यमंत्र्यांचे वेगळं मतं होतं. एल्गारचा तपास एनआयएकडे वर्ग करु नये असं गृहमंत्र्याचं मत होतं तर मुख्यमत्र्यांनी हा तपास एनआयएला देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे कुठेतरी मैत्रीत बेबनाव आल्याचं दिसतं असं त्यांनी सांगितले.
तसेच पूर्वीपासून हे प्रकरण फसवणुकीचं होतं. आम्हाला विचारात घेतलं नाही असं सांगत उद्धव ठाकरे मागच्या शासनातून बाहेर पडले, त्यांना सिद्ध करण्याची संधी आली होती. वारंवार डावलण्यात आलं असा आरोप शिवसेनेने केला होता पण ती सिद्ध करण्याची संधी गमावली. या संधीचा उपयोग त्यांनी केला असता तर शिवसेनेचं वेगळं अस्तित्व दिसलं असतं असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
तसेच १ एप्रिल महाराष्ट्राच्या शासनाच्या दृष्टीकोनातून महत्वाचा आहे, १ एप्रिलपासून एनआरपी लागू होणार आहे. त्याबाबत सुद्धा राज्य सरकारची स्पष्ट भूमिका नाही, अंमलबजावणी करण्यात तिन्ही पक्षाचं एकमत असेल तर सरकार टीकतं. काही पक्ष म्हणाले अंमलबजावणी करा, दुसरे पक्ष नाही बोलले तर हे सरकार टिकणार नाही. सरकारने ठरवलं अंमलबजावणी करायची आणि ज्यांना वाटतं अंमलबजावणी करु नये तर तेदेखील सरकारसोबत आहे असं वाटायला लागतं. त्यामुळे लोक काय ते निर्णय घेतील असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी अप्रत्यक्षरित्या राज्य सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
दरम्यान, सरकारमध्ये जे पक्ष बसलेत त्यांचे विचार अन् मतदार वेगळे आहेत. अगोदर एक निर्णय घेतला जातो, गृहमंत्री वेगळी भूमिका घेतात आणि मुख्यमंत्र्यांनी अधिकाराचा वापर करुन हा तपास एनआयएकडे देण्याची भूमिका घेतली. राज्य सरकारमध्ये कुठेतरी दुरावा निर्माण होतोय असं दिसायला लागलं त्यामुळे संशय निर्माण होतोय, त्यामुळे एकंदरित शासनात एकमत होतंय असं दिसत नाही, काँग्रेस-राष्ट्रवादी एनआयएकडे तपास वर्ग केल्यानंतर भूमिका काय घेते हे पाहावं लागेल, शाब्दिक नाराजी व्यक्त करणार की कृतीतून हे दिसेल हे आगामी काळात स्पष्ट होईल अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडली आहे.