Home शहरे मुंबई २० लाखांची बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या चौघांना बेड्या

२० लाखांची बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या चौघांना बेड्या

ठाणे : सुमारे २० लाख रुपये किंमत असलेली बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या चौघांना येऊरच्या जंगलाच्या प्रवेशद्वारावर वनाधिकाऱ्यांनी सापळा रचून बुधवारी रात्री अटक केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनाधिकाऱ्यांनी हस्तगत केलेली बिबट्याची कातडी तळा-रोहा येथून आणल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे येऊर जंगल परिक्षेत्र वनाधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले. अंदाजे २० लाख रुपयांचे बिबट्याची कातडी विकण्यासाठी चौघे वाहनाद्वारे जंगलाच्या प्रवेशद्वारावर आले होते. पण, गोपनीय माहितीच्या आधारे आधीच सापळा रचून ठेवलेल्या वनाधिकाऱ्यांनी वाहनासह बशीर पठाण, जावेद पठाण (रा. तळा, रायगड) किरण राऊत (रा. निवी), मधुकर कंक (रा. रोहा) यांना अटककेली. त्यांच्याकडून अन्यही माहिती मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन वनाधिकाऱ्यांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. यात रोहा परिसरात आणखी त्यांच्यासोबत या टोळीत कोणकोण आहे, अशा प्रकारे त्यांनी कुठे आणि किती गुन्हे केले आहेत, कोणाला वन्यजीव चर्म विकले आहे, याचा अधिक तपास बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक व संचालक अनवर अहमद करत आहेत. या तपासात येऊर जंगल परिक्षेत्र वनाधिकारी राजेंद्र पवार यांच्यासह परिमंडळ वनाधिकारी सुजय कोळी, विकास कदम, संजय साबळे, अमित राणे, जितेंद्र देशमुख, रमाकांत मोरे, शेखर मोरे, सुशील रॉय, भगवान भगत आदींचा समावेश आहे.