२३ फेब्रुवारी ते १४ एप्रिलपर्यंत महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी अभियान – राज्यमंत्री बच्चू कडू

२३ फेब्रुवारी ते १४ एप्रिलपर्यंत महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी अभियान – राज्यमंत्री बच्चू कडू
- Advertisement -

अमरावती दि 18: महिला व बालविकास  विभागाकडून बालसंगोपन योजना व अनाथ बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ सर्वदूर पोहोचवण्यासाठी येत्या 23 फेब्रुवारी ते 14 एप्रिल या कालावधीत अचलपूर व चांदुर बाजार येथे नोंदणी अभियान राबविण्यात यावे, असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बैठकित दिले. महिला व बालविकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सखोल आढावा शासकीय विश्रामगृहात आज त्यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

महिला व बालविकासचे विभागीय उपायुक्त सुनिल शिंगणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उमेश टेकाळे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अतुल भडांगे, राजश्री कोलखेडे, राजेश वानखेडे, मंगल पांचाळ, रेखा चारथळ आदी उपस्थित होते.

बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ देता येईल अशा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात यावे. त्यांना तात्काळ लाभ देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी हे नोंदणी अभियान राबविण्यात यावे असे त्यांनी सांगितले. या नोंदणी अभियानात अचलपूर व चांदुर बाजार तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा समावेश करण्यात यावा. विहित अर्जाचा नमुना तयार करून अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून बालसंगोपन योजनेचा  लाभ घेणारे व अनाथांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत विधवा, बालके, कोविडकाळात  अनाथ झालेली बालके, एक पालक असलेले बालक यांच्या संपूर्ण माहितीची नोंद घेण्यात यावी. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावे अशा सुचना श्री. कडू यांनी महिला व बालविकास विभागाच्या संबंधीत सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.

योजनेअंतर्गत घेण्यात येणारी माहिती  तातडीने परिपूर्ण अद्ययावत करावी

बालसंगोपन योजना व अनाथांसाठीच्या योजना राबवित असतांना  2013 पासून म्हणजे योजना अंमलात आली तेव्हापासून ते आज पर्यंत प्राप्त अर्जांची संख्या, पात्र अर्ज, अर्जातील त्रुटी,  योजनेअंतर्गत करण्यात आलेला निधीवाटप, नवीन लाभार्थी, याबाबत सर्व माहिती तात्काळ अद्ययावत करून तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश श्री कडू यांनी दिले.

सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा

योजनांची अंमलबजावणी करतांना लाभार्थी निवडीची प्रक्रिया गंभीरपणे पार पाडावी. प्राप्त अर्जाची छाननी योग्य प्रमाणे व तातडीने करावी. जिल्ह्यातील अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यासाठी मोहिम स्वरुपात काम करावे. कोणतेही अनाथ बालक यातुन वगळला जाणार नाही यासाठी प्रयत्न करावे. एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश श्री कडू यांनी दिले.

           व्यसनाधीन कुटूंबासाठी विशेष कार्यक्रम राबविणार

कुटूंबातील व्यसनाधीन व्यक्तिचे समुपदेशन करुन त्या महिलांना आर्थिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योजनेचा प्रारुप आराखडा तयार करण्यात यावा. परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या महिलांना बळ देण्यासाठी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभुमीवर करता येणाऱ्या नाविन्यपुर्ण कामांबाबत श्री कडू यांनी चर्चा केली.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या राबविण्यात येणाऱ्या योजना

मानव विकास योजने अंतर्गत धारणी चिखलदरा या दोन ठिकाणी  तेजश्री फायनान्स सर्विसेसच्या माध्यमातून महिलांना  रोजगारासाठी अनुदान  वितरित करण्यात येत असून सध्या 965 महिला या योजनेचा लाभ घेऊन रोजगार करीत आहेत. अचलपूर येथे अपंगांचे 42 बचत गट निर्माण केले असून  याव्यतिरिक्त अचलपूर येथे 400 व चांदुर बाजार येथे 200 बचत गट निर्माण करण्यात आले आहेत. अल्पसंख्याक महिलांच्या बचतगटाची निर्मिती करण्यावर भर देत असल्याच्या  माहितीचे सादरीकरण माविम चे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी  यावेळी केले.

अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी करावी

अंगणवाडी मध्ये प्रवेश घेतलेली सहा वर्षे आतील अशी बालके ज्यांना ऐकण्यात व बोलण्यात  अडचण येत आहे, अश्या बालकांची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. या तपासणीसाठी डॉक्टरांची एक चमू तयार करावी. तपासणीअंती अडचण असलेल्या बालकांची नावे व संपूर्ण माहिती आरोग्य विभागाला देऊन या बालकांवर तात्काळ वैद्यकीय उपचार सुरू करावे. कोरोनाकाळात  बालकांना आरोग्यविषयक निर्माण झालेल्या समस्यांवर देखील उपचार करण्याचे निर्देश श्री कडू यांनी दिले. अंगणवाडी बांधकाम, माझी कन्या भाग्यश्री योजनेचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.

तिर्थक्षेत्र विकास योजनेला गती द्यावी

तिर्थक्षेत्र स्थळाचा विकास करत असतांना शासन निर्णयातील तरतुदीची पूर्तता करावी. तिर्थक्षेत्र ठिकाणी योग्य त्या सुविधांसाठी निधी खर्च करण्यात यावा. तिर्थक्षेत्राचा विकास करतांना सर्वप्रथम ग्रामपंचायतकडून प्रस्ताव घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. घाटलाडकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निविदा प्रक्रिया व बांधकामासंबंधी माहीती त्यांनी यावेळी घेतली. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या नादुरुस्त इमारतींच्या ठिकाणी नवीन इमारती बांधतांना शासन निर्णयात दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याच्या स्पष्ट सुचना श्री. कडू यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे, प्रविण सिनारे, अतिरीक्त मुख्य कार्यकारीह अधिकारी श्रीराम कुळकर्णी, कार्यकारी अभियंता विजय वाठ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुरुषोत्तम सोळंके,अचलपुरच्या उपअभियंता नीला वंजारी आदी उपस्थित होते.

- Advertisement -