३ जून जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने चला, एक दिवस सायकल चालवूया!

३ जून जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने चला, एक दिवस सायकल चालवूया!
- Advertisement -

तंत्रज्ञानाच्या शोधाने मानवी जीवन सुखी आणि समृद्ध जसे केले तसे पर्यावरणाच्या हानीसारखे काही प्रश्नदेखील निर्माण झाले आहे. त्यावर उत्तरे शोधण्याठीदेखील विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. पण त्यासोबत आपण रोजच्या जीवनशैलीत काही बदल घडवून आणला तर अशा समस्यांमधून मार्ग काढणे अधिक सोईचे होणार आहे. आज जगभरात साजऱ्या होणाऱ्या सायकल दिनाचाही हाच उद्देश आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने १२ एप्रिल २०१८ रोजी केलेल्या ठरावानुसार दरवर्षी ३ जूनला हा दिवस साजरा करण्यात येतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते चालण्यासाठी आणि सायकलींगसाठीच्या सुरक्षित पायाभूत सुविधा उत्तम आरोग्य प्राप्त करण्यासाठी महत्वाच्या ठरतात. खाजगी वाहनाचा उपयोग न परवडणाऱ्या सामान्य माणसासाठी पायी चालण्याची आणि सायकल चालविण्याची सवय त्याला हृदयरोग, मधूमेह, विशिष्ठ प्रकारच्या कर्करोगापासून दूर ठेवते. अशा प्रकारची वाहतूक सुरक्षितच नाही तर किफायतशीरदेखील असते.

सायकल चालविल्या्ने माणसाची रोगप्रतिकारशक्तीह वाढते. केपटाऊन विद्यापीठाचे प्रा.नोक्स यांच्या मते अशाप्रकारचे व्यायाम शरिरातील प्रथिनांचे प्रमाण वाढवतात आणि पांढऱ्या पेशींना क्रीयान्वीत करून प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. मानसीक स्वास्य्ा, वजन कमी करणे, भूक वाढविणे, फुफ्फुसाचे आरोग्य, चांगली झोप येण्यासाठी, बुद्धीचे सामर्थ्य वाढविण्यासाठीदेखील सायकलचा वापर उपयुक्त ठरतो.

जागतिकीकरणाच्या प्रक्रीयेत शहरांचा झपाट्याने विकास होताना रस्त्यावरील सुरक्षित वाहतूक आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठीदेखील सायकलचा उपयोग महत्वाचा आहे. कोरोनाच्या संकटाने वाहतूकीच्या पर्यायाबाबत विचार करण्यास आपल्याला भाग पाडले आहे. या पार्श्वभूमीवर विचार केल्यास सायकलची उपयुक्तता आणखी उठून दितसे.

पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर असे बदल स्विकारणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा अभियाना’त महानगरात सायकल चालविण्यासाठी स्वतंत्र पथ तयार करण्याचाही विचार करण्यात आलेला आहे. धकाधकीच्या जीवनात निकोप जीवनासाठी नवी जीवनशैली स्विकारतांना नव्या पिढीसाठी हा चांगला पर्याय आहे. म्हणून सायकल दिनाच्या निमित्ताने वाहतूकीच्या या साध्या, सोप्या, प्रदूषण विरहीत आणि स्वस्त पर्यायाकडे जगाचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न दरवर्षी करण्यात येतो.

सायकलवर होणारा खर्च लक्षात घेता ती सामान्यांच्या आवाक्यात असल्याने असमानता कमी करण्यासोबत ती इतर सामाजिक सेवा अधिक सुलभ बनविण्यातही उपयुक्त ठरते आणि हवामान बदलाविरुद्धच्या लढ्याला बळ देते. रस्त्यावरची गर्दी कमी करण्यात आणि शहरातील हवा शुद्ध ठेवण्यासही सायकल मदत करते. ही उपयुक्तता लक्षात घेऊन सायकल वापराबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी विविध सामाजिक संस्थादेखील प्रयत्न करतात. जागतिक सायकल दिन हा सामुहिकरित्या केलेला महत्वाचा प्रयत्न आहे.

या दिवसाच्या निमित्ताने प्रशासनासोबतच सामाजिक संस्था, क्रीडा संघटना, खाजगी क्षेत्र आणि अन्य संबंधित क्षेत्रांनी या दिवसाच्या निमित्ताने जनजागृती उपक्रमात सहभाग घेण्याची गरज आहे. सायकल स्पर्धा, सायकल रॅली, जुन्या सायकलींचे प्रदर्शन, सायकल चालविणाऱ्या वयोवृद्धांचा सन्मान, ‘एक दिवस सायकलचा’ सारखे उपक्रम राबवून सहभागी झाल्यास उद्दीष्ट गाठण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. शारीरिक व्यायामासोबत शाश्वत विकासाची हमी देणारे ही सायकल आपणही एक दिवस चालवूया!
-जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

- Advertisement -