Home ताज्या बातम्या ५ हजार गरजूंना आधार पालिका, स्वयंसेवी संस्थांचा उपक्रम

५ हजार गरजूंना आधार पालिका, स्वयंसेवी संस्थांचा उपक्रम

0
५ हजार गरजूंना आधार पालिका, स्वयंसेवी संस्थांचा उपक्रम

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनाचा कहर कमी झाला असला तरीही शहरातील गोरगरीब, भिकारी, अपंग, बेघर आदी गरजूंसमोर दोन वेळेच्या अन्नाची भ्रांत सुटलेली नाही. आर्थिक चक्र मंदावले असल्याने गरजूंच्या मदतीसाठी पुढे येणारे हातदेखील कमी झाले आहेत. गेल्या सव्वा वर्षांपासून करोनाची परिस्थती कायम असल्याने पालिका आणि स्वयंसेवी संस्थांनी पुन्हा शेकडो गोरगरीब-गरजूंना दोन वेळचे अन्न मिळावे, म्हणून उपक्रम हाती घेतला आहे. त्यातून पाच हजार गोरगरीब गरजूंना दोन वेळच्या अन्न पुरविले जात आहे.

मुंबईत करोनाच्या तडाख्याने रस्त्यावर राहाणाऱ्या बेघरांप्रमाणे, भिकारी, गोरगरीब, अपंगत्वाशी सामना करत कसेबसे जगणाऱ्या हजारो जणांना जगण्याची भ्रांत आहे. करोनाचा प्रादूर्भाव असल्याने उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्याने त्यांच्यासमोरील रोजचे अन्न मिळविणेही मुश्कील ठरत गेले. त्यामुळेच, करोनाच्या पहिल्या लाटेपासून पालिकेने गरजूंपर्यंत अन्न पोहोचविण्याची जबाबदारी स्वीकारली. करोनाच्या पहिल्या लाटेत गोरगरीब, बेघर, स्थलांतरित मजूर, हातावर पोट असलेल्या हजारो गोरगरीब-गरजूंना दोन वेळचे अन्न मिळेल, याची काळजी पालिकेने घेतली. त्यासाठी तयार अन्नपाकिटांमध्ये पुलाव, खिचडीचा समावेश करुन त्याचा पुरवठा करण्यास सुरुवात केली. त्याकामी स्वयंसेवी संस्थांनीही सहाय्य केले आहे. त्याच धर्तीवर पालिकेने १४ एप्रिलपासून पुन्हा हा उपक्रम हाती घेतला आहे.

पालिका आणि स्वंयसेवी संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांतून १४ एप्रिलपासून आतापर्यंत ६ लाख २१ हजारांवर अन्नपाकिटे पुरवली जात आहेत. बेघर, भिक्षेकऱ्यांसाठी नेस वाडिया, रामचंद्र मिशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने दुपारी ५,६४५ आणि सायंकाळी ५,०६५ अन्न पाकिटे दिली जात आहेत. ही पाकिटे मुंबईतील सर्वच्या सर्व २४ विभागांतील गरजूंपर्यंत पोहोचतील, याची काळजी घेतली जात आहे. ही वितरण व्यवस्था पालिकेच्या समाज विकास अधिकारी (नियोजन), समुदाय संघटक, करनिर्धारण आणि संकलन खात्यातील एक निरीक्षक, कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने वितरण केले जात आहे. अन्न पुरविण्याची ही जबाबदारी करोनाप्रमाणेच तौक्ते चक्रीवादळावेळीही पार पाडण्यात आली होती.

३ कोटी ७५ लाख गरजूंना आधार

गतवर्षी करोना प्रादूर्भावातील पहिल्या लाटेत पालिका-स्वंयसेवी संस्थांकडून रोज साडेसात लाख गरजूंना जेवण दिले गेले. त्यातून जवळपास ३ कोटी ७५ लाख गरजूंपर्यंत त्याचा लाभ झाला. तसेच, तौक्ते चक्रीवादळावेळीही बेघर-गरजूंना दोन वेळचे जेवण, बिस्कीटे, थेपले, पाणी पुरविण्याकडे लक्ष दिले गेले. तेव्हा, ‘खाना चाहिये’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे सहाय्य करण्यात आले.

यापूर्वी करोनाच्या पहिल्या लाटेवेळी पालिकेने शहरातील झोपडपट्ट्यांसह ठिकठिकाणी अन्न पाकिटे पुरवली होती. त्यावेळी बेस्ट उपक्रमातील बसची मदत घेऊन अन्न पाकिटांचे वाटप करण्यात आले. ही व्यवस्था अधिक सक्षम होण्यासाठी बेस्टने त्यांच्या ताफ्यातील बसमध्ये अंतर्गत बदलही केले होते. त्यामुळे एकावेळी जास्त पाकिटांचे अधिक वितरण होण्याचे कर्तव्य केले.

Source link