ॲमस्टरडॅमच्या अभ्यासभेटीत विधिमंडळ सदस्यांनी जाणून घेतली तंत्रज्ञानाची माहिती

ॲमस्टरडॅमच्या अभ्यासभेटीत विधिमंडळ सदस्यांनी जाणून घेतली तंत्रज्ञानाची माहिती
- Advertisement -

ॲमस्टरडॅम /मुंबई दि. २८ : दुग्ध उत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग व तंत्रज्ञानात नेदरलँड्सने केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे. कोविड काळानंतर भारत आणि नेदरलँड्सने परस्परांमधील व्यापार व उद्योगवाढीच्या दिशेने नवी भरारी घेतली आहे. भारतातील नवउद्यमशील तसेच प्रज्ञावंत नेदरलॅंड्समध्ये उल्लेखनीय योगदान देत आहेत. हे संबंध आणखी दृढ होत जावेत आणि भारताने प्रगतीचा आणखी पुढील टप्पा गाठावा, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या २२ सदस्यांचे शिष्टमंडळ जर्मनी, नेदरलँड्स, इंग्लंड या तीन देशांच्या अभ्यास दौऱ्यावर आहे. त्याचे नेतृत्व डॉ. गोऱ्हे करीत आहेत. आज ॲमस्टरडॅम येथे भारताच्या राजदूत श्रीमती रिनत संधू तसेच तेथील कृषी मंत्रालयातील अधिकारी फ्रेडरिक वोसेनोव यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. या अभ्यासभेटीत आधुनिक कृषी प्रक्रिया तंत्रज्ञान, आरोग्य, प्रदूषण नियंत्रण, जलव्यवस्थापन, पूरनियंत्रण, नैसर्गिक जलस्त्रोत संवर्धन, शिक्षण, दुग्ध प्रक्रिया या क्षेत्रांशी संबंधित विषयांवर शिष्टमंडळ सदस्यांनी माहिती जाणून घेतली.

ॲमस्टरडॅम येथील स्थानिक स्व-शासन संस्थेतील सदस्य प्राची कुलकर्णी यांनी तेथील स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील राज्य व्यवस्थेसंदर्भात माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेत डॉ.मनीषा कायंदे, अभिजित वंजारी, मनीषा चौधरी, सीमा हिरे, प्रज्ञा सातव, मनोहर चंद्रिकापुरे यांनी सहभाग घेतला. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते भारताच्या राजदूत श्रीमती संधू तसेच  सर्व मान्यवरांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

जनावरांमध्ये आढळून येणाऱ्या खूर आणि लाळ रोगांवरील लस निर्मितीसंदर्भात वडील डॉक्टर दिवाकर गोऱ्हे यांचे योगदान, नेदरलँड्सने त्यावेळी घेतलेला पुढाकार या आठवणींना डॉ. गोऱ्हे यांनी उजाळा दिला.

यावेळी नेदरलँड्स येथील मराठी मंडळाचे शिवम जोशी, अमेय धायगुडे, वैशाली नार्वेकर, ऋतुजा केळकर यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी येथे आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

0000

- Advertisement -