Home गुन्हा 1 लाख 20 हजार रुपयांसह सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास

1 लाख 20 हजार रुपयांसह सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास

0

परवेज शेख सांगली-हरिपूर रस्त्यावरील निळकंठनगर येथील निवृत्त हवालदार नंदकिशोर वसंतराव दळवी (रा.दत्तकुंज) यांचा बंगला अज्ञाताने फोडला. रोख 1 लाख 20 हजार रुपयांसह सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याबाबतची फिर्याद दळवी यांनी दिली आहे.


दरम्यान, सांगली ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी दळवी कुटुंबीय रविवारी दुपारी इस्लामपूर येथे त्यांच्या मुलीकडे गेले होते. त्यांच्या घरी दुसर्‍या मजल्यावर महाविद्यालयात शिकणारी मुले भाड्याने राहतात. सोमवारी सकाळी दळवी यांच्या घराच्या समोरील दरवाजाचा कडी कोयंडा तोडल्याचे त्या मुलांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती तात्काळ दळवी यांना कळवली. दळवी सायंकाळपर्यंत परत आले.

त्यावेळी घरातील साहित्य विस्कटलेले होते. कपाट तोडून कपाटातील रोख 1 लाख 20 हजार रुपये, तसेच कर्णफुले, रिंगा आणि देव्हार्‍यातील चांदीची मूर्ती असा मुद्देमाल लंपास झाला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दरवाजा आणि कपटावरील बोटांचे ठसे घेतले आहेत. श्वान पथकाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही सुगावा लागला नाही.