14 जून ;जागतिक रक्तदाता दिन “मानवतेचा एक थेंब रक्त द्या, जीव वाचवा”

14 जून ;जागतिक रक्तदाता दिन  “मानवतेचा एक थेंब रक्त द्या, जीव वाचवा”
- Advertisement -


14 जून ;जागतिक रक्तदाता दिन  “मानवतेचा एक थेंब रक्त द्या, जीव वाचवा”

दि.  १३ जून २०२६ :रक्तदान हे मानवतेचे सर्वोच्च दान मानले जाते. एका रक्तदात्याच्या रक्तदानामुळे तीन ते चार रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे स्वैच्छिक, विना मोबदला आणि नियमित रक्तदानाची चळवळ समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचविणे ही आजची अत्यंत महत्त्वाची गरज आहे.

रक्तदान क्षेत्रातील आधुनिक वैद्यकशास्त्राची भक्कम पायाभरणी करणारे महान शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टायनर यांनी सन १९०० मध्ये ABO रक्तगट प्रणालीचा शोध लावला. त्यांच्या या क्रांतिकारी संशोधनामुळे सुरक्षित रक्त संक्रमण शक्य झाले आणि वैद्यकीय क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाली. त्यांच्या जन्मदिनानिमित्त १४ जून हा दिवस जगभर जागतिक रक्तदाता दिन’ म्हणून साजरा केला जातो.

यावर्षीच्या जागतिक रक्तदाता दिनाचे घोषवाक्य आहे – मानवतेचा एक थेंब रक्त द्या, जीव वाचवा” (One Drop of Humanity, Give Blood, Save Lives). हे घोषवाक्य रक्तदानाच्या माध्यमातून मानवतेची सेवा करण्याचा संदेश देते.

अपघातग्रस्त रुग्ण, मोठ्या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना, कर्करोगग्रस्त रुग्णांना, थॅलेसेमिया व हिमोफिलिया बाधित व्यक्तींना, गंभीर रक्तक्षय असलेल्या रुग्णांना तसेच प्रसूतीदरम्यान रक्तस्राव झालेल्या मातांना अनेकदा रक्तदात्यांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते. आधुनिक वैद्यकीय उपचारांमध्ये रक्ताबरोबरच प्लाझ्मा, प्लेटलेट्स आणि इतर रक्तघटकांचीही मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. त्यामुळे रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नसून सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय कर्तव्य आणि मानवतेची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे.

रक्तदानामुळे दात्याच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. उलट, रक्तदानाच्या निमित्ताने नियमित आरोग्य तपासणीची संधी मिळते आणि समाजोपयोगी कार्य केल्याचे आत्मिक समाधानही लाभते.

देशातील रक्तसुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी युवक-युवतींनी नियमित रक्तदानासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. निरोगी युवक हे देशाच्या सुरक्षित रक्तपुरवठ्याचे खरे आधारस्तंभ आहेत. महिलांनीही वैद्यकीय निकष पूर्ण करून रक्तदानात सक्रिय सहभाग नोंदवावा. महिला रक्तदात्यांचा वाढता सहभाग हा समाजातील सकारात्मक परिवर्तनाचे प्रतीक आहे.

डिजिटल युगात सोशल मीडिया हे रक्तदान जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरत आहे. रक्तदान शिबिरांची माहिती प्रसारित करणे, गरजू रुग्णांना तातडीची मदत उपलब्ध करून देणे, नवीन रक्तदात्यांची नोंदणी करणे आणि रक्तदानासंदर्भातील गैरसमज दूर करणे यासाठी सोशल मीडियाचा सकारात्मक वापर होणे आवश्यक आहे.

रक्तदाते हे समाजाचे खरे जीवनदाते आहेत. त्यांच्या निस्वार्थ योगदानामुळे हजारो कुटुंबांना आशेचा किरण मिळतो. त्यामुळे रक्तदात्यांचा गौरव, सन्मान आणि प्रोत्साहन ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. मात्र, रक्तदान हे कोणत्याही प्रकारच्या आर्थिक लाभ, भेटवस्तू किंवा प्रलोभनासाठी नसून केवळ मानवतेच्या भावनेतून केले गेले पाहिजे. स्वैच्छिक व विना मोबदला रक्तदान हीच सुरक्षित रक्तपुरवठ्याची सर्वात विश्वासार्ह गुरुकिल्ली आहे.

रक्तदान चळवळीची प्रमुख उद्दिष्टे

  • स्वैच्छिक व विना मोबदला रक्तदानाला प्रोत्साहन देणे.
    • सुरक्षित रक्त व रक्तघटकांची सर्वांना उपलब्धता सुनिश्चित करणे.
    • युवक व महिलांना नियमित रक्तदाता म्हणून प्रेरित करणे.
    • रक्तदानाविषयीचे गैरसमज आणि भीती दूर करणे.
    • दुर्मिळ रक्तगट असलेल्या रक्तदात्यांची माहिती संकलित करून त्यांचे प्रभावी नेटवर्क तयार करणे.
    • सोशल मीडियाच्या माध्यमातून रक्तदात्यांचे जाळे अधिक मजबूत करणे.
    • रक्तपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम व कार्यक्षम करणे.
    • समाजात मानवता, बंधुता आणि सामाजिक जबाबदारीची भावना दृढ करणे.

चला, १४ जून ‘जागतिक रक्तदाता दिना’निमित्त नियमित रक्तदानाचा संकल्प करूया आणि मानवतेच्या या महान कार्यात सहभागी होऊन अनेकांना नवजीवन देऊया.

हेमकांत सोनार
रक्तपेढी तंत्रज्ञ, रक्तकेंद्र, अलिबाग-रायगड
मो. ९५११८८२५७८

संकलन :
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग

मानवतेचा एक थेंब रक्त द्या, जीव वाचवा”

(One Drop of Humanity, Give Blood, Save Lives)

00000



Source link

- Advertisement -