Home ताज्या बातम्या 144 कलमानुसार जमावबंदी लागू

144 कलमानुसार जमावबंदी लागू

0

सातारा:सातारा जिल्ह्यातील करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 च्या कलम 144 लागू केले आहे. त्यानुसार सोमवार दि. 20 रोजीच्या सायंकाळी सहा वाजल्यापासून ते पुढील आदेश होईपर्यंत जिल्हयात कोणत्याही ठिकाणी एका वेळेस 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होणेस मनाई करण्यात आली आहे.

हे प्रतिबंधात्मक आदेश पुढील बाबींना लागू राहणार नाहीत. सर्व बॅंका, वित्तीय सेवा व तद्‌संबंधीत आस्थापना. अन्न, दूध, फळे व भाजीपाला, किराणा पुरविणाऱ्या आस्थापना, खते, बियाणे, औषधे, कृषी यंत्रे, अवजारे, ट्रॅक्‍टर उपकरणे व त्यांची दुरुस्ती, स्पेअर पार्ट, स्प्रे पंप, सिंचन साहित्य, पाईप, ठिबक, तुषार सिंचन, शेततळे अस्तरीकरणाचे कागद आदी दुकाने/निर्मिती, मटण, चिकन व मासे हे न शिजवलेल्या स्वरुपात मागणीप्रमाणे घरपोच देता येतील.

दवाखाने, वैद्यकीय केंद व औषधी दुकाने व तदसंबंधित आस्थापना, प्रसार माध्यमे व तद्‌संबंधीत आस्थापना चालू राहतील तथापि पेपरचे घरपोच वाटप बंद राहील. दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, मोबाईल कंपनी टॉवर व तद्‌संबंधित आस्थापना. विद्युत पुरवठा, ऑईल व पेट्रोलियम व उर्जा संसाधने व तद्‌संबंधित आस्थापना. पिण्याचे पाणीपुरवठा व सांडपाणी निचरा करणाऱ्या आस्थापना व वरील सर्व आस्थापनांसाठी अत्यावश्‍यक असणारे वेअर हाऊस, शासकीय इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रोजेक्‍ट, पाणीटंचाई तसेच पावसाळापूर्व अत्यावश्‍यक शासकीय कामे यांना प्राधान्य राहील. पशुखाद्य निर्मिती करणारे कारखाने.

संबंधित आयटी आणि आयटीईएस आस्थापना (कमीत कमी मनुष्यबळाव्दारे) अत्यावश्‍यक सेवा संबंधित वस्तू आणि मनुष्यबळ, वाहतूक करणारे ट्रक, वाहन (आवश्‍यक स्टिकर लावलेले ) जिल्हयातील सर्व औदयोगिक क्षेत्र तसेच औदयोगिक क्षेत्राव्यतिरिक्त मोठे उदयोग, आस्थापना व कारखाने याबाबत शासन परिपत्रकानुसार यापूर्वी दिलेल्या सर्व परवानग्या वैध राहतील. राज्य परिवाहन महामंडळ तसेच सर्व खासगी बसेस बंद राहतील. तथापि, प्रशासकीय, वैदयकीय सेवा पुरविणाऱ्या व करोना नियंत्रणासाठी काम करणाऱ्या शासकीय व खासगी व्यक्तींची वाहतूक करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाला सूट राहील. यासाठी संबंधिताच्या ओळखपत्राची तपासणी करणे बंधनकारक राहील.

कोणत्याही व्यक्तीला जिल्हयातील कोणत्याही रस्त्यावर, गल्लोगल्ली सायकल तसेच पारंपरिक, अपारंपारिक इंधनावर चालणाऱ्या मोटारसायकल (गियरसह, गियरशिवाय), सर्व प्रकारची तीनचाकी, चारचाकी वाहने, हलकी वाहने, मध्यम वजनाची वाहने यांचा प्रवास व वाहतूक यासाठी वापर करण्यास मनाई करण्यात आली असून पुढील लोकांना सूट देण्यात येत आहे. अत्यावश्‍यक सेवेतील अधिकारी- कर्मचारी, करोना नियंत्रणासाठी कार्यरत अधिकारी- कर्मचारी, काम करणाऱ्या खासगी आस्थापना व कर्मचारी, वैद्यकीय उपचाराची गरज असलेल्या व्यक्ती व अत्यावश्‍यक सेवा सुविधा देण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या व्यक्ती वगळून (तथापि, वैद्यकीय उपचारासाठी गाडीमध्ये ड्रायव्हरव्यतिरिक्त एक व्यक्ती प्रवास करतील.) तसेच वैदयकीय क्षेत्रातील सर्व डॉक्‍टर, नर्स, सायंटिस्ट, पॅरामेडिकल स्टाफ, लॅब टेक्‍निशियन व इतर आवश्‍यक असणारा कर्मचारी वर्ग यांना सर्व प्रकारचा प्रवास करता येईल.

थुंकल्यास एक हजार रुपये दंड
जिल्हयातील सर्व शासकीय- निमशासकीय जागा व सर्व खासगी जागा (जेथे सामान्य माणसांचा वावर आहे) अशा कोणत्याही ठिकाणी थुंकण्यास मनाई करणेत येत आहे आणि कोणीही व्यक्ती थुंकल्यास त्याला 1000 रुपये दंड आकारण्यात येईल. हा दंड ती जागा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे जमा करावा लागेल किंवा हा दंड त्या स्थानिक स्वराज्य संस्थेस वसूल करावा लागेल. जिल्हयातील सर्व धार्मिक स्थळे या आदेशान्वये बंद करण्यात येत आहेत. तसेच या जिल्हयाची हद्द वाहनांच्या वाहतूकीसाठी इतर जिल्हयासाठी बंद करण्यात येत आहे.

तसेच जिल्हयात सर्व व्यक्तींना नाक व तोंडास मास्क न लावता घरातून बाहेर पडणेस सक्त मनाई करणेत येत आहे. जिल्हयात विनाकारण अनावश्‍यकपणे वावरणाऱ्या व्यक्तींवर पोलीस अधिक्षकांनी पूर्ण योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवून नियंत्रण ठेवावे. जिल्हयातील जीवनावश्‍यक वस्तूंची अवैध साठेबाजी व काळाबाजार होणार नाही याची दक्षता पोलीस विभाग, पुरवठा विभाग, अन्न व औषध विभाग यांनी घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.