पंढरपूर : पंढरपूर शहरात ऐन गौरी-गणपती सणाच्या काळातच शहरातील एकाकडून रिव्हालवर आणि 5 जिवंत काडतूसं पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गणपतीच्या सणामुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण आहे. त्यात असा शस्त्रसाठा सापडल्यामुळे काही मोठा कट रचण्याचा प्लान होता का अशा चर्चांना उधाण आलं आहे.
पंढरपूर इथल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पंढरपूर इथल्या शिवराज उर्फ भैय्या बाळासाहेब ननवरे (वय 22) या नामक संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अलीकडच्या काही दिवसांमध्ये पंढरपूर शहरात भुरट्या चोऱ्या, हाणामारी आणि गुन्ह्यांचे प्रकार घडत असल्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. या सगळ्यावर कारवाई करतानाचा हा प्रकार घडला आहे.
शहरातील वाढत्या अवैध धंद्यामुळे पुन्हा गुन्हेगारीनं डोकं वर काढलं आहे. अशा परिस्थितीमध्ये शहरात बेकायदा शस्त्रे बाळगण्याचे प्रकार ही या निमित्तने समोर येऊ लागले आहेत. सध्या शहरात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात सुरू आहे. शहरात कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्याचं पोलिसांमोर आव्हान असतानाच एका व्यक्तीकडे गावठी रिव्हालवर आणि 5 जिवंत काडतूसं सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
रविवारी मध्यरात्री संत गजानन महाराज मठा जवळच्या वाहन पार्किंग आवारात गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस आता संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
एक रिव्हालवर आणि 5 जिवंत काडतूसं नेमकी कोणत्या कारणासाठी शहरात आणली असावी याचा शोध घेण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. तर शस्त्रसाठा कोणाकडून आणि कुठून घेण्यात आला याचाही आता पोलीस शोध घेत आहे.