पुणे : गरीब व गरजू व्यक्तींना फक्त 10 रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्याची ‘शिवभोजन’ ही योजना येत्या 26 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. पुणे शहरात शिवभोजन योजना 11 ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात जिल्ह्याच्या मुख्यालयी किमान एक भोजनालय सुरू करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अशा दोन ठिकाणी शिवभोजन सुरू होणार आहे. या दोन्ही शहरांत मिळून सुमारे 1 हजार 500 नागरिकांना जेवण अवघ्या 10 रुपयांत मिळणार आहे. यासाठी नुकतीच एक आढावा बैठक घेण्यात आली. दुपारी 12 ते 2 या वेळेत नागरिकांना जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी जागेचा शोध आणि कोणत्या संस्था पुढे येऊ शकतात, याविषयीचा आढावा नुकताच पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी घेतला.
शिव भोजनालय सुरू करणाऱ्या व्यक्तींकडे स्वत:ची आवश्यक तेवढी जागा असणे आवश्यक आहे. योजना राबविण्यासाठी सद्यस्थितीत सुरू असलेल्या खानावळ, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट, अशासकीय संस्था यापैकी एका सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड केली जाणार आहे. त्याचबरोबर या भोजनालयामध्ये एकाचवेळी किमान 25 लोक जेवण करण्यासाठी बसू शकतात, एवढी आसनव्यवस्था असणे आवश्यक आहे.