Home ताज्या बातम्या 50 लाख 34 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची योजना

50 लाख 34 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची योजना

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातल्या तब्बल 89 लाख पात्र शेतकऱ्यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची योजना असून आतापर्यंत तब्बल 50 लाख 34 हजार शेतकऱ्यांना 24 हजार 101 कोटी रुपयांच्या कर्जमाफीला मान्यता मिळाली आहे. तसेच आतापर्यंत 18 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती आज राज्य सरकारच्या वतीने विधान परिषदेत देण्यात आली.

सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेला लाभ मिळेपर्यंत योजना सुरूच राहील असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सभागृहाला सांगितले. सहाय्यक निबंधकांच्या अध्यक्षतेखाली अर्जांच्या छाननीसाठी एक समिती नियुक्ती करण्यात आली आहे.

ही समिती अर्जांची छाननी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार कर्जमाफीची योजना राबवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिलेल्या शेतकऱ्याला अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याचा आरोप केला, देशमुख यांनी यावर बोलताना एकही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहाणार नाही अशी ग्वाही दिली.

कांद्याच्या किमती आटोक्यात ठेवणार

कांद्याच्या किमती आटोक्यात ठेवण्यासाठी कांदा किमती स्थिर योजनेअंतर्गत नाफेडकडून 50 हजार टन कांदा खरेदी करण्यात येणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कमी बाजारभाव मिळत असल्याचा प्रश्न आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. या प्रश्नाला खोत यांनी उत्तर दिले. दरम्यान, पहिल्या टप्प्याचे कांद्याचे अनुदान दिले असून पुरवणी मागण्या मान्य झाल्यानंतर प्रलंबित अनुदान एका महिन्याच्या आत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असेही त्यांनी सांगितले.

दोन शेतकऱ्यांना अटक आणि सुटका

अशोक मनवर आणि नामदेव पतंगे या दोन शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. कर्जमाफीची मागणी करणाऱ्या या शेतकऱ्यांना विधिमंडळ परिसरातून अटक करण्यात आली. या शेतकऱ्यांना ताबडतोब सोडून द्यावे आणि या शेतकऱ्यांना अटक करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात लावून धरली. अशोक मनवर त्यांना सरकारने कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले, मात्र त्यांची 1 लाख 40 हजार रुपयांची कर्जमाफी झालेली नाही. त्याबाबतचे प्रमाणपत्र आपल्याला दाखवण्यासाठी आल्याचे मुंडे यांनी सांगितले. तरीही त्यांना अटक करण्यात आली. ही बाबही मुंडे यांनी निदर्शनास आणून दिली. यावर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी यांनी संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, दोन्ही शेतकऱ्यांना पोलिसांनी सायंकाळी उशिरा सोडून दिले.