Home ताज्या बातम्या आतडे बाहेर येऊनही ‘तो’ ९ किमी चालत गेला

आतडे बाहेर येऊनही ‘तो’ ९ किमी चालत गेला

वारंगल (तेलंगण): तो धावत्या ट्रेनमधून पडला… त्याचे पोट फाटून आतडे बाहेर आले… तरीही न खचता सर्व धैर्य एकवटून त्याने आपले आतडे पोटात ढकलले आणि आपला जीव वाचवण्यासाठी त्याने तब्बल ९ किलोमीटरचा पायी प्रवास करत हॉस्पिटल गाठले. सुनील चौहान असे या २४ वर्षीय धैर्यवान तरुणाचे नाव असून एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही थरारक घटना तेलंगणमधील उप्पल स्थानकादरम्यान घडली. 

याबाबत रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील चौहान या मूळच्या उत्तर प्रदेशच्या तरुणाने आपला भाऊ प्रवीण आणि इतर स्थलांतरीत कर्मचाऱ्यांसह उत्तर प्रदेशातील बलिया येथून संघमित्रा एक्स्प्रेस पकडली. या सर्वांना आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे जायचे होते. सुनीलची ट्रेन तेलंगणमधील वारंगल जिल्हयात पोहोचली होती. सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास सुनील टॉयलेटला जाण्यासाठी आपल्या जागेवरू उठला. मात्र दरवाजाजवळच्या वॉशबेसीनजवळ येताच त्याचा तोल जाऊन तो ट्रेनमधून बाहेर फेकला गेला. 

या घटनेबाबत रेल्वे पोलीस निरीक्षक के. स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील वॉशबेसीनजवळ आला त्याच वेळी वेगात असलेल्या ट्रेनने एक वळण घेतले. यामुळे सुनीलचा तोल गेला. सुनीलला पडताना कोणत्याही प्रवाशाने पाहिले नाही. सुनीलच्या पोटाला जबर मार लागला होता आणि त्याचे आतडेही पोटातून बाहेर आले होते. 

खाली कोसळल्यानंतर सुनील वेदनांनी तडफडू लागला. मात्र, काही वेळाने आपले आतडे पोटाच्या बाहेर आल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने बाहेर आलेले आतडे कसेबसे पोटात ढकलले. त्यानंतर आतडे पुन्हा बाहेर येऊ नये यासाठी आपला शर्ट काढून त्याने पोटाला बांधला आणि किर्र काळोखात सुनील रेल्वे रुळांमधून चालू लागला. पुढचे हसमपार्थी स्टेशन येईपर्यंत तो चालत होता. सुनील ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणापासून हे अंतर ९ किमी इतके आहे. 

सुदैवाने, रेल्वे रुळांमधून कुणीतरी धडपडत चालतंय हे हसनपार्थी स्टेशनचे स्टेशन मास्तर नवीन पंड्या यांच्या लक्षात आले. पंड्या यांनी वेळ न दवडता सुनीलला वारंगलच्या महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. इथे सुनीलवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सुनीलची प्रकृती अजूनही नाजूक असली तरी स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.