Home शहरे औरंगाबाद ‘एमआयएम’चा शंभर जागांवर दावा

‘एमआयएम’चा शंभर जागांवर दावा

औरंगाबाद : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड आणि इच्छुक उमेदवारांची वाढलेली संख्या पाहता वंचित बहुजन आघाडीने सर्व २८८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एमआयएम’ने शंभर जागांची मागणी केली असून दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते जागा वाटप निश्चित करणार आहेत. लहान-मोठ्या जातींना समान संधी देत विधानसभेत अधिक जागा जिंकण्याचे नियोजन ‘वंबआ’ने केले आहे. 

लोकसभा निवडणुकीप्रमाणे काँग्रसेशी आघाडी करण्याचे चर्चेचे गुऱ्हाळ न लांबवता वंचित बहुजन आघाडीने राज्यात विधानसभेच्या २८८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठवाड्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून विविध पक्षातील इच्छुक उमेदवारांनी पक्षांतर करीत ‘वंचित’च्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सत्तेपासून वंचित लहान-मोठ्या जातींना एकत्रित करून विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याचे पक्के नियोजन ‘वंबआ’ने केले आहे. मतदारसंघातील जातीय समीकरण लक्षात घेऊन वंचित अनुकूल ठरणार असल्याचे राजकीय समीकरण आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघासाठी शनिवारी मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीला ग्रामीण भागातून आलेल्या इच्छुक उमेदवारांची लक्षणीय संख्या होती. दलित-मुस्लिम या हक्काच्या मतदारांशिवाय ओबीसी घटक सहाय्यभूत ठरणार असल्याचे इच्छुक उमेदवारांनी सांगितले. औरंगाबाद शहरातील तीन मतदारसंघासाठी वंचित आणि एमआयएम यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. राज्यातील १०० जागांवर ‘एमआयएम’ने दावा केला आहे. याबाबत ‘वंबआ’ आणि ‘एमआयएम’च्या वरिष्ठ नेत्यात चर्चा होऊन जागा वाटप निश्चित होणार आहे. सध्या जिल्हानिहाय आढावा घेत पक्षाकडून नियोजन करण्यात येत आहे.  लोकसभा निवडणुकीत प्रचाराला मर्यादा आल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत अॅड. प्रकाश आंबेडकर, खासदार असदुद्दीन ओवेसी आणि मी प्रचाराचा धुरळा उडवणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी मेळाव्यात सांगितले. विधानसभेत अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य असल्याचे जलील यांनी म्हटले आहे.