Home शहरे अकोला कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या  बालकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या  बालकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

0
कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या  बालकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

सातारा दि.19 : कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांनी स्वत:ला एकटे समजू नये. संकटावर मात करा, आपले विचार चांगले ठेवा आणि पुढे जा. आपल्याला काही समस्या असतील तर त्या आम्हांला सांगा तुमच्या समस्या सोडविल्या जातील तुमच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये जिल्ह्यातील कोविड-19 मुळे मयत झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या वारसांना सानुग्रह अनुदान धनादेशाचे व कोविड मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अनाथ प्रमाणपत्राचे वाटप ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी जिल्हा कार्यक्रम अधिकारी (बाल कल्याण)  रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांच्यासह  विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, संकट हे दणकट बनविते. आपण घाबरुन न जाता प्रत्येक आव्हानाचा सामना करावा. अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर  या सर्व महिला आहेत.  कोरोना संसर्गाच्या कालावधीत कोणीही घराबाहेर पडत नव्हेत त्यावेळी प्रत्येक घटकापर्यंत पोहचून त्यांनी काम केले आहे त्यांचे कौतुकही  ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले.

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला काम करीत आहे. त्यांच्यासाठीच चौथे महिला धोरण आखण्यात आले असून त्याचे 8 मार्च 2022 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण  करण्यात येणार आहे. या महिला धोरणाचा मसुदा अंतिम टप्प्यात असून या धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध कमिट्यांचीही स्थापना करण्यात येणार असून प्रत्येक 6 महिन्याला या कमिट्यांमार्फत आढावा घेतला जाणार आहे.  यामुळे महिला धोरण प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे.  मसुदा अर्पण झाल्यानंतर तो प्रत्येक महिलेने वाचावा, आपल्याला काय हक्क दिले आहेत त्याची माहिती करुन घ्यावी, असे आवाहनही महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या.