Home शहरे अकोला डॉ.सी.डी.देशमुख यांच्या नावाला साजेशी वास्तू साकारा – उपमुख्यमंत्री अजित पवार

डॉ.सी.डी.देशमुख यांच्या नावाला साजेशी वास्तू साकारा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
डॉ.सी.डी.देशमुख यांच्या नावाला साजेशी वास्तू साकारा – उपमुख्यमंत्री अजित पवार

अलिबाग,दि. 27 (जिमाका) :- मूळ रोह्याचे असलेले डॉ. चिंतामणराव देशमुख उर्फ सी. डी. देशमुख हे एक कर्तुत्ववान व्यक्तिमत्व होते. अशा या महान व्यक्तिमत्वाच्या नावाला साजेशी वास्तू उभी करावी, त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. रोहा येथे डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाचा भूमिपूजन सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी श्री. पवार बोलत होते.

यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, सभापती गीताताई जाधव, बबन मनवे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, तहसिलदार कविता जाधव, पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच स्व.कुसुमाग्रज व डॉ.चिंतामणराव देशमुख यांच्या स्मृतीला अभिवादन करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील तमाम जनतेला व कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेल्या नागरिकांना मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

ते पुढे म्हणाले,करोना काळात राज्यावर आर्थिक संकट ओढवले होते. मात्र या शासनाने राज्यातील विकासकामांना खीळ बसणार नाही, विकासकामांची गती मंदावणार नाही, याकरिता सर्व प्रकारे काळजी घेतली. रायगडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 406 कोटींचा नियतव्यय मंजूर केला, महिलांसाठी शंभर खाटांचे विशेष रुग्णालय , 93 पर्यटन स्थळांना जोडणारा रेवस-रेड्डी मार्ग, 720 किलोमीटर समुद्रकिनारा पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठीचे नियोजन, आंतरराष्ट्रीय विमानतळ, जलवाहतूक वाढीस लागण्यासाठी त्या दृष्टीने नियोजन, जिल्ह्यात तेरा आयकॉनिक पूलांचे भव्यदिव्य नाविन्यपूर्ण काम त्याचबरोबर तालुका क्रीडा संकुलासाठी 5 कोटी, जिल्हा क्रीडा संकुलासाठी 25 कोटी तर माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुलासाठी 50 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. ही सर्व कामे दर्जेदार होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावेत, या कुठल्याही कामासाठी निधीची कमतरता पडू दिला जाणार नाही.

उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की, डॉ.सी.डी.देशमुख हे स्वतंत्र भारताच्या अर्थशास्त्रातील मोठे नाव होते. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री, रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर, विद्यापीठ अनुदान समितीचे पहिले अध्यक्ष अशा विविध मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडताना ते आपल्या मूळ गावाला मात्र कधीही विसरले नाहीत. त्यांच्या नावाने साकारले जाणारे हे शहर सभागृह व नाट्यगृह सर्वोत्तम होईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जावे. 22 कोटी 70 लाख इतक्या निधीतून साकारल्या जाणाऱ्या या सभागृहात 800 खुर्च्या, सोलर पॅनल, संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा, सुसज्ज वाचनालय, कॅफेटेरिया, ग्रीन रूम, प्रोजेक्ट रूम, अत्याधुनिक ध्वनीक्षेपण यंत्रणा अशा विविध सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. यासाठी अधिक निधीची गरज लागली तरी तो पुरविला जाईल.

कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्प उत्तम झाल्याबाबत समाधान व्यक्त करुन उपमुख्यमंत्री श्री.पवार पुढे म्हणाले की, जनतेचे प्रश्न त्यांच्या गरजा लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेने विविध नाविन्यपूर्ण योजना राबवून नव्या पिढीला जुना वारसा जतन करण्याचे संस्कार द्यावेत. हे काम रोहा येथे कुंडलिका नदी संवर्धन, शिवसृष्टी, छत्रपती शिवाजी महाराजांचा साकारण्यात येणारा 35 फूट पुतळा, स्वराज्यातील महत्त्वाच्या सहा किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्याच्या कामातून केले जात आहे, याबद्दल संबंधित सर्वांचे श्री.पवार यांनी अभिनंदन केले. तसेच या भागात जागतिक दर्जाची “बाग” साकारण्यात यावी, असे आवाहन करताना त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी पुनःश्च सांगितले. शेवटी  युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी काळजी करू नये. केंद्र व राज्य शासन त्या सर्वांना सुखरूपपणे आपापल्या घरी परत आणण्यात नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

पालकमंत्री कु.आदिती तटकरे आपल्या मनोगतात म्हणाल्या की, आजचा दिवस रोहेकरांसाठी अतिशय आनंदाचा व अभिमानाचा दिवस आहे. जिल्ह्यातील विविध विकास कामांना उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या खंबीर पाठबळामुळे गती मिळत आहे. नुकतेच भूमीपूजन झालेल्या अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शंभर खाटांचे महिलांसाठी विशेष रुग्णालयाला मंजूरी, विविध पर्यटनस्थळांचा विकास, त्यातून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न, ट्रॉमा केअर सेंटर, कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पासह येथे साकारण्यात येणारी शिवसृष्टी, सहा महत्त्वाच्या किल्ल्यांची प्रतिकृती, छत्रपती शिवाजी महाराजांचा साकारण्यात येणारा 35 फूट पुतळा, तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावरील क्रीडा संकुले अशा विविध विकासकामांमुळे व त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठबळामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास गतीने होईल यात शंकाच नाही तसेच यापुढेही आपण लोकहिताची कामे, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबवित राहू, असेही त्या म्हणाल्या.

खासदार सुनील तटकरे यावेळी म्हणाले की, कुंडलिका नदीच्या आसपासचा परिसर “राज्यस्तरीय नगरोत्थान” योजनेंतर्गत सुशोभित करण्यात आला. पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित केली. कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर तसेच जिल्ह्याच्या इतर भागातही पर्यटनदृष्ट्या विविध विकास कामांना सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे “क” वर्ग नगरपालिका कार्यक्षेत्रात राज्यातील विविध नाट्यगृहाच्या तोडीचे किंबहुना त्याहूनही देखणे सभागृह रोहा नगरपरिषदेचे असणार आहे. हे राज्यातील असे पहिले नाट्यगृह असेल असे सांगून ते पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षात कोकणावर विविध संकटे आली. मात्र अर्थमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भक्कम पाठबळ दिले. त्यामुळे कोकण विभागातील नागरिकांना नुकसानभरपाई व इतर शासकीय लाभ जलद गतीने मिळाले.

शेवटी खासदार तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खंबीर साथीने या जिल्ह्यात कला, क्रीडा, साहित्य व इतर क्षेत्रातही विविध दर्जेदार विकास कामे केली जातील,अशी ग्वाही याप्रसंगी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विधान परिषद सदस्य आमदार श्री.अनिकेत तटकरे यांनी रोह्याच्या या भूमीत साकारल्या जाणाऱ्या डॉ.सी. डी.देशमुख सभागृहाची रचना कशी असेल, त्याचा उपयोग येथील जनतेला कशा प्रकारे होणार आहे, कशा पद्धतीने ते साकारले जाणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली आणि या सर्व विकासकामांसाठी भरघोस निधी व मार्गदर्शन उपलब्ध करून देत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष आभार मानले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला व डॉ. सी.डी.देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक संजय भुस्कुटे यांनी केले तर आभार मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी मांडले. कार्यक्रमाचा समारोप रायगड पोलीस बँड पथकाने वाजविलेल्या राष्ट्रगीताच्या धूनने झाली.

000