Home बातम्या ऐतिहासिक व्हिलचेअर बास्केटबॉलमुळे दिव्यांग बांधवांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत होणार – राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू

व्हिलचेअर बास्केटबॉलमुळे दिव्यांग बांधवांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत होणार – राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू

0
व्हिलचेअर बास्केटबॉलमुळे दिव्यांग बांधवांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत होणार – राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू

अमरावती दि. 4 :-   अमरावती व्हिलचेअर बास्केटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या प्रशिक्षणामुळे दिव्यांग बांधवांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांच्यातील सांघिक भावना वाढीस लागेल, असा विश्वास जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे व्यक्त केला.

विभागीय क्रीडा संकुलाच्या परिषद सभागृहात अमरावती व्हिलचेअर बास्केटबॉल संघटनेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या प्रशिक्षणाला आजपासून सुरुवात झाली असून ते 6 मार्चपर्यंत चालणार आहे. क्रीडा उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे शारिरीक शिक्षण संचालक सुभाष गावंडे, रुपाली इंगोले, सुगंध बंड, क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने, शारिरीक शिक्षक संदिप इंगोले, शिव छत्रपती पुरस्कारार्थी डॉ. नितीन चवाडे, व्हिलचेअर बास्केटबॉल संघटनेच्या पदाधिकारी राजश्री पाटील, प्रशिक्षक शरद नागणे, मार्गदर्शक योगेश देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

अमरावती व्हिलचेअर बास्केटबॉल संघटना, श्री शिवाजी सायंन्स कॉलेज, महाराष्ट्र व्हिलचेअर बास्केटबॉल संघटना तसेच निना फाऊंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्यमंत्र्यांच्या पुढाकाराने दिव्यांग बांधवांना व्हिलचेअर बास्केटबॉलचे वाटप करण्यात आले.

दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे, यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून त्यांना क्रीडा क्षेत्रातही नैपुण्यपूर्ण कामगिरी बजावता यावी, यासाठी प्रोत्साहन दिले जाते.  असे सांगून श्री कडू पुढे म्हणाले की, दिव्यांग बांधवांसाठी व्हिलचेअर बास्केटबॉल प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरात असा प्रशिक्षण कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात आला आहे. पुण्यावरुन आलेल्या प्रशिक्षण चमूमार्फत स्थानिक प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मैदानी खेळ खेळण्यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. यासाठी क्रीडा क्षेत्राची आवड असलेल्या दिव्यांग बांधवांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री कडू यांनी यावेळी केले.

दिव्यांग बांधवांसाठी दरवर्षी एक हजार करोड रुपये खर्च करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. क्रीडा क्षेत्रातील दिव्यांग बांधवांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी दिव्यांग क्रीडा संघटनेची निर्मिर्ती करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली.

क्रीडा क्षेत्रामध्ये कामगिरी बजावणाऱ्या दिव्यांग बांधवांना आहार व पोषणासाठी राज्यमंत्र्यांनी 51 हजार रुपयांची राशी श्रीमती राजश्री पाटील यांच्याकडे यावेळी सुपूर्द केली. व्हिलचेअर बास्केटबॉल प्रशिक्षणाचा लाभ घेऊन प्रशिक्षित चमू तयार करा. यासाठी कोणतेही सहाय्य लागल्यास मी सर्वोतोपरी मदत करेल, असा विश्वास राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी व्यक्त केला.