Home शहरे अकोला विधानसभा प्रश्नोत्तरे – महासंवाद

विधानसभा प्रश्नोत्तरे – महासंवाद

0
विधानसभा प्रश्नोत्तरे – महासंवाद

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी संबंधित बॅंकांना सूचना देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 7 :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नव्याने कर्ज घेण्यासाठी अडचण होऊ नये, त्यांना कर्ज मिळावे, यासाठी सर्व संबंधित बॅंकांना सूचना देऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभेत देवेंद्र फडणवीस, नाना पटोले यांचेसह विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले आदी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.

३१.७१ लाख कर्जखात्यांना २० हजार २५० कोटींचा लाभ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत ३२.८२ लाख पात्र कर्ज खाती असून आधार प्रमाणिकरण झालेल्या ३२.२९ लाख कर्जखात्यांपैकी ३१.७१ लाख कर्जखात्यांना २० हजार २५० कोटी रुपयांचा लाभ देण्यात आल्याचे सहकारमंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

आधार प्रमाणिकरण झालेले नसल्याने काही शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत तर काही बॅंकांचे राष्ट्रीयकृत बॅंकांत विलिनीकरण झाल्यामुळे अडचणी आल्याचे सांगून या योजनेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केली असल्याचेही सहकारमंत्र्यांनी सांगितले. कर्जमुक्ती योजनेत कोणत्याही तालुक्यातून बोगस प्रकरणे झालेली नाहीत असे निदर्शनास आलेले आहे, असे स्पष्ट करुन पीककर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे, असेही सहकारमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

००००

देवसरीतील 99 घरांच्या पुनर्वसन प्रस्तावाला मान्यता देणार – मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील देवसरी या पूरग्रस्त गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव महिन्याभरात पाठविण्याच्या सूचना जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांना देण्यात येतील आणि या प्रस्तावाला मान्यता देऊन या गावातील 99 घरांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य संतोष बांगर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, २००६ मध्ये झालेली अतिवृष्टी आणि पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे देवसरी गावातील पूरबाधित १८७ कुटुंबांपैकी ९९ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास सादर केला होता. हा प्रस्ताव शासनाने १ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या शासन पत्रान्वये अमान्य करण्यात आला. या बाधित कुटुंबांचे पुनर्वसन होणे अभिप्रेत असताना हा प्रस्ताव परत केला आहे. त्यामुळे पुनर्वसन अधिकाऱ्यांनी महिन्याभरात हा प्रस्ताव शासनाकडे पुन्हा सादर करण्याच्या सूचना देण्यात येतील आणि या प्रस्तावाला मान्यता देऊन ९९ घरांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी सभागृहाला सांगितले.

००००

नागरी सुविधांसाठी मौजे कामठा आणि जोडपिंपरी गावांना अनुक्रमे ४३ आणि १९ लाखांचा निधी मंजूर – मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

मुलभूत नागरी सुविधांसाठी हिंगोली जिल्ह्यातील मौजे कामठा आणि जोडपिंपरी या गावांना अनुक्रमे ४३ लाख आणि १९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, त्यातील दोन टप्प्यांत निधी दिला असून मागणी आल्यास शिल्लक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य चंद्रकांत नवघरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले की, अंजनवाडी या पूरग्रस्त गावाचे पुनर्वसन तेथील ग्रामस्थांनी केले असून मुलभूत नागरी सुविधा तेथे पुरविल्या आहेत. १९७६ पूर्वीच्या प्रकल्पामुळे प्रकल्पग्रस्त कामठा व जोडपिंपरी या गावठाणातील नागरी सुविधा कामांच्या अंदाजपत्रकांना शासनाने मान्यता प्रदान करुन निधी देखील वितरीत केल्याचे मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.

००००

कोळगाव उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरचा गरजेप्रमाणे वापर – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

सोलापूर जिल्ह्यातील कोळगाव-जेऊर उपविभागातील धरणालगत असलेल्या कोळगाव उपकेंद्रात तात्पुरत्या स्वरुपात ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला होता, तो बंद पडलेला नाही तर त्याचा गरजेप्रमाणे वापर सुरु असून त्यामुळे कोणताही तोटा किंवा नुकसान झालेले नाही, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य संजयमामा शिंदे आणि बबनराव शिंदे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री श्री.तनपुरे म्हणाले की, कोळगाव उपकेंद्रातील 5 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरवरुन तीन वाहिन्यांद्वारे त्या भागातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यात येत आहे. या पॉवर ट्रान्सफॉर्मरवरील भार कमी करण्यासाठी ३.१५ एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर तात्पुरत्या स्वरुपात बसविण्यात आला होता. त्यानंतर धरणातील पाण्याचा साठा कमी झाल्यामुळे आणि इतर कारणांमुळे तो ट्रान्सफॉर्मर बंद करण्यात आला.  ३१ जानेवारी २०२२ रोजी ३ एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर या उपकेंद्रात कार्यन्वित करण्यात आला असून गरजेप्रमाणे त्याचा वापर सुरु आहे. हा ट्रान्सफॉर्मर बंद केल्यामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही हे राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी स्पष्ट केले.

००००

सौर कृषिपंपाच्या देखभाल दुरुस्तीसाठी शेतकरी मेळावे घेऊन मार्गदर्शन करणार – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

सौरकृषिपंपांच्या देखभाल-दुरुस्ती मार्गदर्शनासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यन्वित करण्याबरोबरच शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन त्यांना सौरकृषि पंप वापराबाबत मार्गदर्शन केले जाईल, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य मंगलप्रभात लोढा यांनी वाशिम जिल्ह्यातील औरंगपूर येथे मुख्यमंत्री कृषिपंप योजनेंतर्गत बसविण्यात आलेले सौरपंप नादुरुस्त असल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी उत्तर दिले. औरंगपूर येथील श्रीमती सिंधुबाई भगत यांनी त्यांच्या शेतात मे. स्पॅन पंप्स, पुणे या कंपनीद्वारे बसविलेल्या सौरकृषिपंपाबद्दल तक्रार केली होती. या तक्रारीचे निराकरण देखील कंपनीद्वारे करण्यात आले होते, त्यानंतर श्रीमती भगत यांनी त्यांच्या सौरकृषिपंपाबद्दल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यावेळी या पंपाची तपासणी केली असता स्प्रिंक्लरवर लावलेले पाईप हे व्यवस्थित न बसवल्याने पाणी येत नसल्याचे निदर्शनास आले, ते व्यवस्थित करुन देण्यात आलेले असून श्रीमती भगत यांनी त्यांच्या तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले आहे, असे सांगून ऊर्जा राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी सौरकृषिपंप वापराची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी मेळावे घेतले जातील, तसेच आगामी येऊ घातलेल्या ‘कुसुम’ योजनेतूनही माहिती दिली जाईल, असे सांगितले.

००००

गडचिरोलीतील १३७४ शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी वीजजोडण्या; उर्वरितांना प्राधान्याने वीजजोडण्या देणार – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

गडचिरोली जिल्ह्यात २०१८-१९ पासून जानेवारी २०२२ पर्यंत कृषिपंप वीज जोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित असलेल्या ४ हजार १३८ अर्जदारांपैकी १ हजार ३७४ अर्जदारांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. उर्वरित २ हजार ७६४ अर्जदारांना कृषिपंप वीज जोडणी धोरण-२०२० नुसार प्राधान्याने वीज जोडण्या देण्यात येणार आहेत, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्ह्यात पैसे भरुनही शेतकऱ्यांना कृषिपंपाना वीज जोडणी देण्याबाबत सदस्य कृष्णा गजबे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला राज्यमंत्री श्री.तनपुरे यांनी उत्तर दिले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जुन्या वीज जोडणी धोरणामुळे सन २०१८-१९ पासून तीन वर्ष जोडण्या दिल्या जाऊ शकल्या नाहीत. त्यावेळच्या धोरणानुसार सुमारे १.२९ लाख जोडण्या देण्यात आल्या होत्या. नंतरच्या काळात कृषिपंप वीज जोडणी धोरण-२०२० आणले, नव्या धोरणानंतर एकाच वर्षात १.३४ लाख कृषि पंप वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. जो मागेल त्याला वीज जोडण्या देण्याचे धोरण असून जिल्हा नियोजन समितीमधून अथवा गावस्तरावरच्या निधीतून देखील यासाठी खर्च केला जाईल, असेही राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी सांगितले.

००००