Home बातम्या ऐतिहासिक भावनिकतेचा सामना विवेकाने केल्यास मानसिक स्वावलंबनाच्या दिशेने महिलांची वाटचाल : दिप्ती राऊत

भावनिकतेचा सामना विवेकाने केल्यास मानसिक स्वावलंबनाच्या दिशेने महिलांची वाटचाल : दिप्ती राऊत

0
भावनिकतेचा सामना विवेकाने केल्यास मानसिक स्वावलंबनाच्या दिशेने महिलांची वाटचाल : दिप्ती राऊत

नाशिक, दि. 08 (जिमाका वृत्तसेवा): माध्यमातील महिलांचे विश्व अनेक आव्हानांनी भरलेले आहे. त्यातल्या त्यात शासकीय जनसंपर्काच्या क्षेत्रात सदैव सतर्क राहणाऱ्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिवसरात्र कौटुंबिक, सामाजिक समस्या आणि संघर्षाचा सामना अटळ असला तरी, भावनिकतेचा सामना विवेकाने केल्यास मानसिक स्वावलंबनाच्या दिशेने महिलांची वाटचाल प्रशस्त होईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध महिला पत्रकार दिप्ती राऊत यांनी आज केले आहे.

त्या आज जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित संवाद क्षेत्रातील महिलांचे स्थान या विषयावर आयोजित परिसंवादात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष स्थानी  विभागीय माहिती उपसंचालक  ज्ञानेश्वर इगवे, माहिती अधिकारी अर्चना देशमुख, सहाय्यक संचालक मोहिनी राणे, माहिती सहाय्यक जयश्री कोल्हे , जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना दिप्ती राऊत म्हणाल्या, कोरोना काळात वर्क फ्रॉम होमच्या चौकटीत काम करणे माध्यमे आणि जनसंपर्काच्या क्षेत्रात वावरणाऱ्या महिलांसाठी अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक होते. त्यातल्या त्यात पहिल्या लाटेत या आव्हानांची तीव्रता अधिक जाणवत होती. परंतु वर्क फ्रॉम होमच्या चौकटीतून मुक्त होऊन कार्यालयात सर्वात अगोदर पोहचणाऱ्या ही महिलाच होत्या. एक महिला चोवीस तासात पहिली शिफ्ट कुटुंबियांसाठी, दुसरी शिफ्ट कार्यालयीन कर्तव्यांसाठी, तिसरी शिफ्ट पुन्हा कुटुंबियांसाठी आणि चौथी व शेवटची शिफ्ट ती स्वत:साठी अशा रितीने काम करत असते. महिलांना प्रत्येक ठिकाणी गृहित धरले जाते ‍ही केवळ आपलीच नाही तर संपूर्ण जगाची मानसिकता आहे. असे सांगून त्या म्हणाल्या, वीस ते पस्तीस या वयोगटात मुले जेव्हा स्वत:चे करियर विकसित करीत असतात त्या काळात महिला मात्र कुटुंब व्यवस्था आणि कुटुंब सांभाळण्यात विभागल्या जातात.

महिलांना समाजाकडून सर्वच पातळीवर केवळ माणूस  म्हणून वागणूक मिळावी ही माफक अपेक्षा असते. गेल्या कित्येक वर्षांपासून 10 वी 12 वी पासून तर थेट उच्च शिक्षणापर्यंत गुणवत्ता यादीत येणाऱ्या  महिला भविष्यात कुठे  जातात, त्यांच्या वाट्याला आलेले यश आणि अपयश हे सुद्धा ज्याप्रमाणे जन्माला येण्यापूर्वीच आयुष्य संपलेल्या मुलींचा शोध घेतला जातो त्याप्रमाणे तपासण्याची गरज आहे. असेही त्या यावेळी म्हणाल्या.

महिलांचे कुटुंबाव्यतिरिक्त कामाच्या ठिकाणी एक स्वतंत्र अस्तित्व असते. त्यासाठी तिला विलक्षण सचोटी बाळगावी लागते. स्वत:च्या कुटुंबासोबतच महिलांचे कार्यालयीन जीवनातही त्यांच्या सहकाऱ्यांसोबत स्वतंत्र कुटुंब भावना निर्माण झालेली असते. महिलांच्या सदगुणांचा आणि चांगुलपणाचा कर्तव्याच्या ठिकाणी पुरूषांकडून नेहमीच सन्मानच झाला असून महिलांच्या कौटुंबिक जबाबदारीत पुरूषांने 50 टक्के जबाबदारी उचलली तर खऱ्या समानतेचे व महिला सक्षमीकरणाचे द्योतक ठरेल असेही, त्यांनी यावेळी आर्वजून सांगितले.

नोकरदार महिला अधिक सक्षमतेने निभावतात कौटुंबिक जबाबदाऱ्या : ज्ञानेश्वर इगवे

गेली वीस वर्षापासून नोकरीच्या निमित्ताने घरापसासून व कुटुंबापासून दूर राहिलो आहे. परंतु या काळात माझी अर्धांगिनी ही स्वत: नोकरदार असून, तिने कौटुंबिक जबाबदारी अधिक सक्षमतेने निभावली याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. व्यक्तीस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य व आर्थिक स्वातंत्र्य याची सुरूवात प्रत्येक पुरूषाने स्वत:च्या घरातून केली तरच खऱ्या अर्थाने आपण स्त्री जीवनाचा माणूस म्हणून केलेला सन्मान असेल. अशा भावना यावेळी विभागीय माहिती उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे यांनी व्यक्त केल्या आहेत.

यांचा झाला सत्कार

यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती अधिकारी अर्चना देशमुख, सहाय्यक संचालक मोहिनी राणे, माहिती सहाय्यक जयश्री कोल्हे यांनी कोरोना काळात शासकीय संवादात निभावलेल्या उत्कृष्ट कर्तव्याबद्दल गौरव व सन्मान पत्रकार दिप्ती राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सत्कारार्थींनी आपले मनोगतही व्यक्त केले. 

कर्मचारी संघटनेकडून करण्यात आला गौरव

माहिती व जनसंपर्क कर्मचारी संघटना नाशिकच्या वतीने अध्यक्ष राजू चौघुले व सचिव शा म माळवे यांनी  यावेळी प्रमुख वक्त्या दिप्ती राऊत, माहिती अधिकारी अर्चना देशमुख, सहाय्यक संचालक मोहिनी राणे, माहिती सहाय्यक जयश्री कोल्हे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी तर आभार प्रदर्शन माहिती सहाय्यक किरण डोळस यांनी केले. 

यांची होती उपस्थिती

यावेळी चलत छायाचित्रकार पांडूरंग ठाकूर, छायाचित्रकार प्रमोद जाधव, वरिष्ठ लिपिक जालिंदर कराळे, अतुल सोनवणे, साहेबराव जगताप, संतु ठमके, छगन खैरनार, सुरेश कुमावत आदी उपस्थित होते