Home बातम्या ऐतिहासिक महिला सबलीकरणाची सुरुवात प्रत्येकाने स्वत: पासून करावी – प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर

महिला सबलीकरणाची सुरुवात प्रत्येकाने स्वत: पासून करावी – प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर

0
महिला सबलीकरणाची सुरुवात प्रत्येकाने स्वत: पासून करावी – प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर

मुंबई, दि. 8 : महिला सबलीकरणाचा प्रयत्न प्रत्येक व्यक्तीने व्यक्तीगत स्वरूपात करणे आवश्यक आहे. नागरी भागातील महिला उच्च शिक्षण, व्यवसायाने स्वावलंबी झालेल्या दिसतात. या महिलांनी समाजातील किमान एका गरजू मुलीला शिक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या सहकार्य करावे, सक्षम करावे, तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण होण्यास मदत होईल आणि महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल, असे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी व्यक्त केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना महासंचालक श्री.कपूर बोलत होते.

 या कार्यक्रमास संचालक (माहिती)(प्रशासन) गणेश रामदासी, संचालक (वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे, महिला अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन संशोधन अधिकारी मयुरा देशपांडे यांनी तर, उपसंचालक (प्रदर्शने) सीमा रनाळकर यांनी मनोगत केले.

प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर म्हणाले, शहरी भागातही महिलांना निर्णय स्वातंत्र्य मिळालेले नसल्याचा अनुभव  येतो. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातील स्त्रीयांची स्थिती असल्याचे चित्र दिसून येते. आजही महिलांचे निर्णय पुरूषांवर अवलंबून असतात. त्यामुळे महिला सशक्तीकरण आणि सबलीकरणासाठी आणखी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पुरूषांची पारंपरिक मानसिकता बदलणेही गरजेचे आहे.  महिलांच्या कर्तृत्वाची जाण, त्यांचे आपल्या जीवनातील योगदान याचे स्मरण केवळ एक दिवस नव्हे तर नित्य होत राहणे आवश्यक आहे.

आज आपल्यातील अनेक महिला उच्च शिक्षणाने स्वावलंबी झालेल्या दिसतात, त्यांनी समाजातील अन्य महिलांना सर्व माध्यमांतून सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगून श्री.कपूर यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

संचालक श्री.गणेश रामदासी म्हणाले, स्त्री ही खऱ्या अर्थाने शक्ती आहे आणि म्हणूनच ती नात्यांच्या सर्व रुपांमध्ये वंदनीयच असली पाहिजे. आज कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून नोकरी, व्यवसाय करताना महिलांची अनेकदा तारेवरची कसरत होते. त्यामुळे त्यांच्या श्रमाचा आदर करायला प्रत्येकाने शिकले पाहिजे, असे सांगून त्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

०००