मुंबई, दि. 8 : समाज आणि देशाच्या विकासासाठी महिलांना सबळ करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.
राज्य महिला आयोगाच्या वतीने आदिशक्ती प्रेरणा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, डॉ. इंदिरा हिंदुजा आदी उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले की, महिलांकडे कौशल्यपूर्ण काम करण्याची नैसर्गिक गुणवत्ता असते. त्यांना संधी दिली तर त्या अतिशय उल्लेखनीय काम करतात. समाज आणि देशाच्या विकासासाठी महिलांना विविध क्षेत्रात संधी दिली पाहिजे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांनी राज्यातील महाविद्यालय आणि विद्यापीठ परिसर छेडछाडमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. मुलींना भयमुक्त वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड म्हणाल्या, महाराष्ट्रातील अनेक महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महिलांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. महिलांनी आपल्या अंगभूत गुणवत्तेला विकसित केले पाहिजे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेची माहिती देणारी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे मार्गदर्शन असलेला संदेश व्हिडिओ क्लिपद्वारे दाखविण्यात आला.
यावेळी पोलीस आयुक्त संजय पांडे, डॉ. इंदिरा हिंदुजा यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी लोहारा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक दिपमला भेंडे, सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी आगाशे, पोलीस कर्मचारी रेणुका सांगळे, प्रतिमा डेरे, श्रीमती रजनीगंधा गेडाम, संध्या दूरधवे, औरंगाबाद जिल्ह्यातील टपरगावच्या सरपंच रुपाली मोहिते, उपसरपंच वैशाली तुपे, सीमा भगवान, संध्या मोहिते, नाशिकच्या माधुरी आहेर, संगीता टेकाडे, नगरच्या ॲड. रंजना पवार-गवांदे, पोलीस उपायुक्त नियती ठाकर-दवे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेखा धस, पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या दीक्षा दिंडे, मनिषा तोकले यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रास्ताविक तर कार्यकारी अधिकारी दीपा ठाकूर यांनी आभार मानले.
0000