Home शहरे अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय व सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या सुविधेसाठी खाटा वाढवाव्या- राज्यमंत्री बच्चू कडू – महासंवाद

जिल्हा स्त्री रुग्णालय व सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या सुविधेसाठी खाटा वाढवाव्या- राज्यमंत्री बच्चू कडू – महासंवाद

0
जिल्हा स्त्री रुग्णालय व सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या सुविधेसाठी खाटा वाढवाव्या- राज्यमंत्री बच्चू कडू – महासंवाद

अमरावती दि 12 : जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत, तसेच रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांना खाटांची कमतरता भासू नये यासाठी तात्काळ खाटांची संख्या वाढविण्यात यावी. तोवर रुग्णांसाठी तसेच विशेषतः प्रसूतीसाठी येणाऱ्या स्त्रियांना तात्पुरती व प्रभावी सुविधा म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे  मोफत उपचार करण्यात यावे, असे निर्देश जलसंपदा व कामगार मंत्री बच्चू कडू यांनी दिले.

येथील शासकीय विश्रामगृहात आज राजमंत्र्यांनी आरोग्यबाबत सुविधांचा आढावा  घेतला त्यावेळी ते बोलत होते. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या वाठोडकर, विभागीय संदर्भीय सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरुप्रकाश खोब्रागडे, पंजाबराव  देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. सोमेश्वर निर्मळ, अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे प्रशासन अधिकारी पंकज भुतडा उपस्थित होते.

जननी सुरक्षा योजना प्रभावीपणे राबवावी

 ग्रामीण भागातील स्त्रिया या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतात. गर्भवती स्त्रियांवर उपचार, गर्भवतींचे लसीकरण, त्यांना पोषणाबाबत माहिती देणारी व स्त्रियांची मोफत प्रसूती करून त्यांना घरापर्यंत सुरक्षितपणे सोडणारी ही योजना असून स्त्रीयांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. शासकीय रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण व कुटीर रुग्णालयात जननी सुरक्षा योजनेची  प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश श्री कडू यांनी यावेळी दिले.

नवजात बालक कक्षात अद्ययावत उपकरणांसाठी 1 कोटीचा निधी

जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात बालकांवर उपचारासाठीचे असलेले कक्ष अद्ययावत उपकरणांनि  सज्ज असावे. नवजात बालके व प्रामुख्याने वेळेआधी प्रसूती होऊन जन्म झालेल्या  बालकांवर उपचारासाठी उष्मायन पेटींची संख्या वाढविण्यात यावी. यासाठी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 1 कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले.

इतर वैद्यकीय सुविधांचा घेतला आढावा

 सद्यस्थितीत उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे कोरोना रुग्णालयातील रिक्त खाटांची व्यवस्था जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात यावी.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचा दुसऱ्या टप्पा पूर्ण क्षमतेने कार्यरत करण्यात यावा. यासाठी मनुष्यबळाची पूर्तता करणारा, रुग्णांच्या मेंदू व मज्जासंस्था संबंधित आजारावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञाची चमू उपलब्ध असावी यासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून शासनास सादर करावा. वेळेत उपचार आवश्यक असलेल्या रुग्णांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी.असे निर्देश श्री कडू यांनी दिले.

शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेचा घेतला आढावा

शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना कार्यक्षमपणे राबवावी

उद्योगाच्या विकासासाठी,उद्योग टिकवण्यासाठी व आवश्यक असलेली विविध कार्ये करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा पुरवठा करून उद्योगांमध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध करावे. असे निर्देश श्री कडू यांनी बैठकीत दिले

राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना व महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना याबाबत श्री कडू यांनी आढावा घेतला. शिकाऊ उमेदवारी योजना अधिक कार्यक्षमपणे राबवावी.असे  श्री कडू यांनी यावेळी सांगीतले

यावेळी  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहायक संचालक  नरेंद्र येते, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी प्रफुल शेळके, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिगंबर पारधी आदी उपस्थित होते.