नागपूर, दि. 12 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासाला चालना देतानाच शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी एकत्रित अंमलबजावणी करावी, अशा सूचना ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या.
जुने सचिवालय परिसरातील नवीन प्रशासकीय इमारत येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्तालयाच्या नुतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून रोहयो समितीचे अध्यक्ष आमदार मनोहर चंद्रिकापुरे, अपर मुख्य सचिव नंदकुमार, मनरेगा आयुक्त शंतनू गोयल, जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला, सहाय्यक संचालक विजयकुमार कळवले, श्री. शिरभाते आदी उपस्थित होते.
टंचाई व दुष्काळी परिस्थितीत मनरेगाच्या माध्यमातून शेतकरी व शेतमजुरांसाठी रोजगार उपलब्ध होत असून मजुरीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होत असल्याचे सांगताना पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले की, कोरोना काळात ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना यामुळे दिलासा मिळाला आहे. रोहयोच्या माध्यमातून विविध योजना एकत्रित करून लाभ दिल्यास शेतकरी व शेतमजुरांची आर्थिक प्रगती होईल. रोहयोच्या योजनांसोबत इतर योजनांचा समन्वय करावा. यासाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची जिल्हा समन्वय समिती तयार करावी, अशी सूचना त्यांनी केली.
मनरेगा आयुक्तालयाला आग लागल्यामुळे नव्याने कार्यालय तयार करण्यात आले आहे. या कार्यालयातून सर्व लाभार्थ्यांना रोजगारासह चांगल्या सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली.
रोहयो मंत्री संदीपान भुमरे
प्रत्येक व्यक्ती हा लखपती व्हावा, यासाठी मनरेगाच्या माध्यमातून विविध विभागांच्या योजनांची एकत्रित अंमलबजावणी करण्यास प्राधान्य असल्याचे सांगताना रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे म्हणाले की, राज्यात 52 हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 24 लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्याचे नियोजन आहे. मनरेगाच्या माध्यमातून राज्यात दरवर्षी एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात येणार आहे. मातोश्री पांदन रस्त्याला शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
रोजगार हमी योजना तथा इतर मागास कल्यान विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी विविध विभागांच्या अभिसरणातून ग्रामीण भागात योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी दशवार्षिक गावांचे नियोजन करण्यात आले आहे. रोहयोच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थी लखपती व्हावा. तसेच ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसोबत सर्वसामान्य शेकऱ्यांच्या शेती व पूरक उद्योगांना चालना मिळावी. त्यासाठी ग्रामस्तरावर नियोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रारंभी मनरेगा आयुक्त शंतनू गोयल यांनी स्वागत करून प्रास्ताविकात ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना समृध्द करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले.
प्रारंभी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी कार्यालयाची पाहणी केली. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामरोजगार सेविकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.