Home शहरे अकोला विधान परिषद लक्षवेधी

विधान परिषद लक्षवेधी

0
विधान परिषद लक्षवेधी

उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, दि. 14 : उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नाशिक विभागातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून पंचनामे सुरु असून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार या शेतकऱ्यांना मदत केली जाईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत दिली.

याबाबतची लक्षवेधी सूचना विधानपरिषद सदस्य नरेंद्र दराडे यांनी मांडली होती.

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वाडीबुद्रुक येथील श्री. कैलास सुर्यभान कवडे या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियांस 4 लाख इतकी आर्थिक मदतही करण्यात आली आहे, असेही श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.

000

आधारकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाहीशालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई, दि. 14 : राज्यातील शाळेतील विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्यास त्यांची नावे शाळेच्या हजेरी पटावरुन कमी करण्यात येत नाहीत किंवा त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात नाही. आधारकार्ड नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत नाही, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषद सदस्य ॲड.निरंजन डावखरे यांनी नियम 93 अन्वये राज्यात शाळेतील विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसलेल्यांची नावे शाळेच्या पटावरुन कमी करण्याची सूचना शिक्षण विभागाने दिली असल्याचे निदर्शनात येणे, त्यामुळे पालकांमध्ये निर्माण झालेला असंतोष याबाबत नियम 93 अन्वये सूचना मांडली होती. त्यावर शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत निवेदन केले.

पोर्टलवार नोंद करताना विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक विचारला जातो, तो फक्त डेटा उपलब्ध असावा म्हणून असतो परंतु विद्यार्थ्यांना सक्ती केली जात नाही किंवा त्यांना वर्गाबाहेर किंवा हजेरी पटावरील नाव कमी केले जात नाही. आधारकार्ड नाही म्हणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले जाणार नाही असेही श्रीमती गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

000

कंत्राटी संगणक निदेशक आणि अर्धवेळ ग्रंथपालांबाबत प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवून निर्णय घेणार – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई, दि. 14 : केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यात सन 2005 पासून जवळपास 8 हजार संगणक प्रयोगशाळा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. या 8 हजार संगणक प्रयोशाळाकरिता संगणक निदेशकांची नियुक्ती पुरवठादार संस्थेमार्फत कंत्राटी तत्वावर करण्यात आली होती. सध्या या सर्व संगणक प्रयोगशाळा संबंधित शाळेला हस्तांतरीत करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे संबंधित संगणक निदेशकांच्या सेवेसंदर्भात मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवण्यात येईलख्‍ अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिली.

याबाबत विधानपरिषद सदस्य कपिल पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देतांना श्रीमती गायकवाड बोलत होत्या.

श्रीमती गायकवाड म्हणाल्या, अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असून याबाबतचाही प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेऊन निर्णय घेण्यात येईल.

तसेच शासन निर्णय 2010 अन्वये यापूर्वीच्या अनुदान सुत्रात सुधारणा करण्यात येऊन अनुदान पात्र शाळांना सरसकट 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय कायम आहे. फेब्रुवारी 2021 अन्वये त्रुटी असलेल्या अपात्र शाळांची विभागनिहाय सुनावणी ठेवून त्रुटीची पूर्तता करणाऱ्या शाळांना अनुदानास पात्र करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला आहे. याबाबत सभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत एकत्रित बैठक घेऊन यावर निर्णय घेण्यात येईल, असेही शालेय शिक्षण मंत्री श्रीमती गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

या लक्षवेधीमध्ये विधानपरिषद सदस्य सतिश चव्हाण, डॉ.रणजित पाटील, विक्रम काळे, यांनी सहभाग घेतला होता.

000

पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार मंत्री सुनील केदार

मुंबई, दि. 14 : वाढते पशुधन आणि विभागाची प्रशासकीय गरज लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी विधानपरिषदेत दिली.

याबाबत विधानपरिषद सदस्य अरुण लाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना पशुसंवर्धन मंत्री श्री. सुनील केदार बोलत होते.

राज्यातील पशु वैद्यकीय दवाखान्यांच्या निकषांबाबत सर्वंकष आढावा घेण्यासाठी समिती गठित करण्यात आली असून या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल. तसेच फिरते पशुवैद्यकीय दवाखाना म्हणून ॲम्ब्युलन्स सेवा सुद्धा सुरु करण्यात आली आहे असेही श्री. केदार यांनी यावेळी सांगितले.

या लक्षवेधी सूचनेमध्ये विधानपरिषद सदस्य विक्रम काळे, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला होता.

000

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अपूर्ण कामे लवकरच पूर्ण करणार ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, दि. 14 : मागील दोन वर्षात कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे झालेल्या लॉकडाऊन आणि अपुरा निधी यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काही मंजूर कामे अपूर्ण आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत. ही मंजूर कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत दिली.

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामे पूर्ण झाली नसल्याबाबतची लक्षवेधी सूचना विधानपरिषद सदस्य संजय दौंड यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. सत्तार यांनी ही माहिती दिली.

ग्रामविकास राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले, सन 2018-19 मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (संशोधन व विकास) अंतर्गत ही कामे मंजूर करण्यात आली होती. या कामांवर आतापर्यंत 9.42 लक्ष इतका खर्च झाला आहे. ही कामे प्रगतीपथावर असून 3 कामांपैकी 2 कामे पूर्ण झाली आहेत. दरम्यान लॉकडाऊनमुळे राज्याच्या आर्थिक विकासावर मर्यादा आल्या आणि त्यामुळे पूर्ण निधी उपलब्ध होऊ शकला नाही. ही कामे सुरु झाली असून या कामांची राज्य गुणवत्ता निरिक्षक (SQM) यांनी वेळोवेळी पाहणी केली आहे. याअंतर्गत उत्कृष्ट दर्जाची कामे करण्यात येत आहेत. ही अपूर्ण राहिलेली कामे मे 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असेही श्री. सत्तार यांनी यावेळी सांगितले.

या लक्षवेधी सूचनेमध्ये सदस्य सर्वश्री अनिकेत तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहभाग घेतला.

000

विश्वविजेत्या दिपक शिंदे आणि हिमानी परब यांचा शासनाकडून विशेष सत्कार करणार

मुंबई, दि. 14 : मल्लखांब खेळामध्ये विश्वविजेत्या ठरलेल्या दिपक शिंदे व हिमानी परब यांचा राज्य शासनाकडून विशेष सन्मान करुन त्यांचा सत्कार करण्यात येईल, असे क्रीडा राज्यमंत्री कु. अदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत दिली.

याबाबत लक्षवेधी सूचना विधानपरिषद सदस्य विजय ऊर्फ भाई गिरकर यांनी मांडली होती.

राज्यातील अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासनसेवेत थेट नियुक्ती करण्याच्या खेळाच्या यादीमध्ये मल्लखांब खेळाचा समावेश करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

केंद्र शासनाने विविध विभागातील गट क मधील पदांवर खेळाडूंच्या नियुक्ती संदर्भात एकत्रित सूचना दिल्या आहे. यामध्ये 43 खेळप्रकार निश्चित केले आहेत. त्यानंतर केंद्र शासनाने खेळाडूंच्या नियुक्तीसाठी 43 ऐवजी 63 खेळ प्रकार निश्चित केले आहेत. या खेळ प्रकारांच्या यादीमध्ये ‘मल्लखांब’ या देशी क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे.

मल्लखांब या देशी खेळ प्रकारातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे याकरिता ‘मल्लखांब’ या खेळास 5 टक्के खेळाडू आरक्षणाचे लाभ देण्यात येत आहे. थेट नियक्तीमध्ये सुद्धा या खेळाचा समावेश करण्यात येईल आणि अशा खेळाडूंना क्रीडा विभागामध्ये नियुक्ती करण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन आणि नवीन खेळाडू तयार होण्यास मदत होईल, असेही राज्यमंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले.

या लक्षवेधीमध्ये विधानपरिषद सदस्य कपिल पाटील, अनिकेत तटकरे, सतिष चव्हाण, संजय दौंड, अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला होता.

000

काशिबाई थोरात/विसंअ/14/03/2022