Home बातम्या ऐतिहासिक विधान परिषद प्रश्नोत्तरे : – महासंवाद

विधान परिषद प्रश्नोत्तरे : – महासंवाद

0
विधान परिषद प्रश्नोत्तरे : – महासंवाद

नागपूर येथे १ मे पर्यंत ई-लायब्ररी सुरू – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 16 : नागपूर महानगरपालिका अंतर्गत मानेवाडा येथे अद्यावयात अशा ई-लायब्ररीच्या इमारतीचे बांधकाम झाले असून या ई-लायब्ररीत डिजिटल वृत्तपत्रांबरोबर, पुस्तके, मराठी वाक्यप्रचार अशा विविध प्रकारच्या माहितीचे स्त्रोत विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ई-लायब्ररीत दुर्मिळ तसेच हस्तलिखित साहित्यही उपलब्ध असणार असून या लायब्ररीचे बांधकाम पूर्ण होत असून उर्वरित कामे युद्धपातळीवर करून दि. 1 मे पर्यंत ही ई-लायब्ररी सुरू करण्यात येईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांचा विकास या योजनेंतर्गत या ई-लायब्ररीकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याकरिता निधीची कमतरता भासल्यास ती पूर्ण करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री.शिंदे यावेळी सांगितले.

ई-लायब्ररी संदर्भात प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी  उपस्थित केला होता.

00000

बेलापूर किल्ल्याचे काम आता पुरातत्व विभागाकडे – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 16 : बेलापूर किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी सिडकोने मे.किमया आर्किटेक्स या वास्तुशास्त्रज्ञाची नेमणूक केली होती. त्यांनी दिलेल्या आराखड्यानुसार संवर्धन व जीर्णोद्धाराची कामे सिडकोमार्फत करण्यात येत आहे. तथापि, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने बेलापूर किल्ला या स्मारकाचे सुशोभिकरण व संवर्धन करण्याकरिता पूर्वपरवानगी आवश्यक असून ही कामे पुरातत्वीय विभागाच्या निकष व संकेतानुसार करणेबाबत सिडकोला कळविण्यात आले. त्यानुसार सर्व बाबींची तांत्रिक पडताळणी करून पुरातत्व विभागाने ना हरकत परवानगी दिली. मात्र सततच्या पावसाच्या माऱ्यामुळे व शेजारील जड वाहतुकीच्या हादऱ्यांमुळे या किल्ल्यातील चौकोनी बुरूजाचा काही भाग ढासळला असल्याने या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच यापुढे आता या किल्ल्याचे काम पुरातत्व विभागाकडे देण्यात आले असून याकरिता निधी सिडकोकडून देण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

यासंदर्भात प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.

000

रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के योजनेंतर्गत सिडकोचा भूखंड – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 16 : रायगड जिल्ह्यातील दत्तू ठाकूर व इतर यांची जमीन नवी मुंबई प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली असून यापैकी काही हेक्टर क्षेत्र 12.5 टक्के योजनेंतर्गत भूखंड वाटपासाठी पात्र आहे. या पात्र क्षेत्रासाठी 1 हजार चौरस मीटरचा भूखंड देय असून त्यांना द्रोणागिरी नोड येथे  300 चौरस मीटरचे भूखंड वाटप करून उर्वरित 700 चौरस मीटरचे भूखंड संभाव्य सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता. नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यातील प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींना 12.5 टक्के योजनेचा लाभ देण्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल, असे श्री.शिंदे यांनी सांगितले.

000

सफाई कामगारांकरिता २९ हजार सेवा निवासस्थाने – मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 16 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना 12 हजार निवासस्थाने देण्यात येणार असून 35 वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी 11 गट  तयार करण्यात आले आहे. याकरिता डिझाईन ॲण्ड बिल्ट टर्नकी बेसिसवर निविदा व फेरनिविदा मागविण्यात आल्या होत्या. तद्नंतर 6 नोव्हेंबर 2020 रोजी एक अंतिम प्रतिसाद प्राप्त झाला. या निविदेद्वारे 29 हजार कर्मचाऱ्यांना ही सर्व्हिस घरे द्यायची असून ही जागा दाटीवाटीच्या ठिकाणी असल्याने बांधकामास 24 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सफाई कामगारांच्या 46 वसाहती असून त्यामधील 29 हजार 816 कर्मचाऱ्यांपैकी अंदाजे 5592 कर्मचाऱ्यांना सेवा निवासस्थाने देण्यात आली आहे. सफाई कामगारांच्या वसाहती या सन 1960 दरम्यानच्या असून अनुचित प्रकार व जिवितहानी टाळण्यासाठी गट 2 व गट 3 मधील 12 वसाहतींचा पुनर्विकास कंत्राटदारांमार्फत करायचा असून या पुनर्विकासाबाबतची सर्व जबाबदारी ही कंत्राटदारावर सोपविण्यात आली असून देखभाल व दुरूस्तीचा कालावधीचा 10 वर्षांचा करण्यात आला आहे. आर.सी.सी. कामाकरिता एम 40 एम.एम.ग्रेडचे कॉक्रीट वापरण्यात येणार असून संबंधित कंत्राटदाराने 24 महिन्यात काम केले नाही तर त्यांच्यावर दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. अत्यंत चांगले आणि दर्जात्मक काम होईल. त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना मालकी तत्त्वावरील घरे देण्यासंदर्भात शासन तसेच महापालिका विचार करेल, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.

यासंदर्भात विधान परिषद सदस्य प्रसाद लाड, विजय उर्फ भाई गिरकर, सुनिल शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

000

अकोला-अकोट महामार्गाचे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

मुंबई, दि. 16 : अकोला – अकोट हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने हा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो. या रस्त्याच्या लांबीमध्ये सुधारणा व पुन:स्थापनेच्या कामाकरिता एम.बी.पाटील या कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र मुदतीत काम पूर्ण न झाल्याने या कंत्राटदाराचा करारनामा रद्द करण्यात आला असून या कंत्राटदाराची अनामत (परफार्मन्स सिक्युरीटी) रक्कम जप्त करण्याबाबत केंद्र सरकारला कळविण्यात आले आहे. त्यामुळे आता हे काम 31 डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेत सांगितले.

शेगाव-देवरी वरील देवरी फाटा व रौंदळा मधील काम पाटसुळ येथील वन विभागातील 350 मी लांबी व अडसूळ फाटा येथील रस्त्याचे काम पूर्ण झाले असून रस्ता वाहतुकीस खुला असल्याची माहिती त्यांनी दिली. मागील सरकारने राज्यातील टोल बंद केले असल्याने टोलचा खर्च विद्यमान सरकारवर आला आहे. त्यामुळे भविष्यात सर्वच ठिकाणी टोल आकारणी करण्याबाबत शासन निर्णय घेईल, असेही श्री.चव्हाण यांनी सांगितले.

यासंदर्भात विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी, डॉ.रणजीत पाटील, गोपिचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

000

कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील ११४४२ अनधिकृत बांधकामावर कारवाई – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 16 : कल्याण डोबिवली महानगरपालिकेच्या 10 प्रभागक्षेत्र कार्यालयामार्फत 11 हजार 442 अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली असून 455 अनधिकृत बांधकामधारकांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात आता शासकीय जागेवर अनधिकृत बांधकामे करण्याचे धाडस कोणीही करणार नसल्याचे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य रविद्र फाटक यांनी उपस्थित केला होता.

000

ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मुंबईतील ४२ कामे पूर्ण, १३ प्रगतीपथावर – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 16 : ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत 58 कामांपैकी 42 कामे पूर्ण झालेली असून 13 कामे प्रगतीपथावर आहे. ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत प्रस्तावित एकूण 8 पर्जन्य जल-उदंचन केंद्रापैकी 6 पर्जन्य जल उदंचन केंद्रासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मोगरा येथे पर्जन्य जल-उदंचन केंद्रासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी जागेच्या मालकीबाबत प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार केवळ सर्वेक्षण व आराखडे तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने एप्रिल 2009 ते मार्च 2021 या कालावधीत नाले सफाईच्या कामाकरिता 1136 कोटी खर्च केले आहे. सन 2015-2016च्या नालेसफाईच्या कामांमध्ये गैरव्यवहार निदर्शनास आल्यानंतर मनपा आयुक्तांनी 14 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी एक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने त्याच्या विरूद्ध निलंबनाची कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच नालेसफाईच्या गैरव्यवहार प्रकरणी पहिल्या टप्प्यात 13 तर दुसऱ्या टप्प्यात 80 अशा 93 कर्मचाऱ्यांवर चौकशी पूर्ण करून 70 अपचारी कर्मचाऱ्यांवर दंडात्मक शिक्षेचे शिक्षादेश बजाविण्यात आले आहे.

यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके, विजय उर्फ भाई गिरकर यांनी उपस्थित केला होता.

000

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प विस्तारात १२८ कुटुंबांचे पुनर्वसन – वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 16 : चंद्रपूरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार करताना कोळसा येथील 49 कुटुंब व बोटेझरी येथील 79 कुटुंब असे एकूण 128 कुटुंबाचे पुनर्वसन भगवानपूर येथे करण्यात आले असून या कुटुंबांना 18 नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात 47 हजार रूपये प्रती कुटुंब प्रोत्साहनात्मक रक्कमेसोबत जनावरांच्या गोठ्यासाठी प्रती कुटुंब 58 हजार रूपये अदा करण्यात आले आहे. वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 13 हजार रूपये ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानामधून देण्यात आले असल्याचेही वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

भगवानपूर येथील लाभार्थ्यांना यापूर्वी वाटप करण्यात आलेल्या शेत जमिनीव्यतिरिक्त प्रती कुटुंब 2 हेक्टर शेत जमीन वाटप करण्यात आली आहे. त्याचबरोबर भगवानपूर येथील इको विकास समितीस डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेंतर्गत 25 लाख रूपये आणि व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानअंतर्गत 5 लाख रूपये अदा करण्यात आले असल्याचेही श्री.भरणे यांनी सांगितले.

यासंदर्भात प्रश्न विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर यांनी उपस्थित केला होता.

000